पिंपरी : टाळेबंदीच्या र्निबधाला वैतागलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांनी बुधवारी पिंपरीच्या महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. प्रामुख्याने रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्या, अशी मागणी व्यापाऱ्यांनी या वेळी केली.

पिंपरी व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालिका मुख्यालयात महापौर तसेच आयुक्तांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनाही या बाबतचे स्वतंत्र निवेदन देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाची रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. करोनामुळे लागू केलेल्या र्निबधांचा व्यापारी वर्गाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. व्यापाऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. दुकानाचे भाडे, कर्जाचे हप्ते, कामगारांचे पगार, इतर सरकारी कर, मुलांचा शैक्षणिक खर्च, दैनंदिन घरखर्च आदी विविध कामांसाठी लागणारे पैसे उरले नाहीत. सततच्या र्निबधांमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे र्निबधांमध्ये सवलत मिळावी.

आठवडय़ाचे सातही दिवस रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

व्यापाऱ्यांची मागणी रास्त आहे. करोना संसर्गदर कमी झाला असल्याने काही प्रमाणात र्निबध शिथिल करण्यास हरकत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत आग्रही मागणी करू. मात्र, व्यापाऱ्यांनी करोना नियमांचे पालन केलेच पाहिजे.

– माई ढोरे, महापौर, पिंपरी-चिंचवड