पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करुन त्यातून ९४ हजार ५०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलच्या वेटरला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिसेंबर महिन्यात पिंपरी-चिंचवडच्या लांडेवाडी चौकातील मधुबन बार अँड रेस्टराँमध्ये ही घटना घडली. उमेश देविदास अन्वेकर (वय ३५ , राहणार- पिंपळे गुरव) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. अन्वेकर आपल्या अन्य चार मित्रांसोबत चार डिसेंबर रोजी मधुबनमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी बिल भरण्यासाठी वेटरला डेबिट कार्ड दिले होते. थोड्या दिवसांनी त्यांच्यातील तीन जणांच्या डेबिट कार्डमधून पैशांचा व्यवहार झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तिन्ही कार्डमधून अनुक्रमे, ५० हजार, २५ हजार आणि १९ हजार ५०० रुपयांचा व्यवहार झाला होता.

आणखी वाचा- धक्कादायक! तब्बल 10 कोटी भारतीयांचा चोरीला गेलेला क्रेडिट-डेबिट कार्ड डेटा इंटरनेटवर विक्रीला

तक्रार आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात मधुबन हॉटेलच्या डेबिट कार्ड स्वाइप करणाऱ्या मशिनमध्ये ‘स्कीमर’ लावण्यात आल्याचं आढळलं. ‘स्कीमर’मुळे मशिनमध्ये स्वाइप झालेल्या डेबिट कार्डचे क्लोनिंग केले जाते. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी रविवारी हॉटेलच्या वेटरला अटक केली आहे. त्याने अजून काही ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग केले आहे का याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. पण या घटनेमुळे हॉटेलमध्ये बिल भरण्यासाठी डेबिट कार्ड स्वाईप करताना सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचं अधोरेखीत झालंय.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad waiter clones debit cards using skimmer on card machine swipes 94500 rupees sas
First published on: 05-01-2021 at 10:01 IST