पिंपरी महापालिकेची वाल्हेकरवाडी येथील प्राथमिक शाळा धोकादायक अवस्थेत आहे. बालवाडी ते सातवीपर्यंतचे जवळपास ८०० विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांवर धोक्याची टांगती तलवार असून कधीही काहीही होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे. पालिकेने पर्यायी शाळा उभारण्याचा पर्याय दिला, मात्र त्या शाळेचे काम रडतखडत सुरू आहे.

विद्यार्थ्याचा एक पाय शाळेत तर एक पाय रस्त्यावर –

पिंपरी-चिंचवडची नगरपालिका असताना (१९७८) मध्ये वाल्हेकरवाडीची शाळा बांधण्यात आली. तेव्हा जेमतेम चार खोल्या होत्या. पुढे त्याची स्वतंत्र इमारत उभारण्यात आली. आता या इमारतीत सर्व मिळून सात वर्गखोल्या असून शाळेत ८०० विद्यार्थी व ३० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आहेत. सध्याची जागा अपुरी पडते आहे. शाळेच्या दोन्ही बाजूने वाहतुकीचे रस्ते असून शाळा मधोमध आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचा एक पाय शाळेत तर एक पाय रस्त्यावर, अशी धोकादायक परिस्थिती आहे.

पर्यायी इमारत बांधण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू –

दुसरीकडे, इमारतीच्या भिंती मोडकळीस आल्या आहेत. बांधकाम जुने आहे. छप्पर तसेच भिंत पडण्याचा धोका असल्याचे नागरिक सांगतात. ठोस उपाययोजना करण्याऐवजी वेळोवेळी डागडुजीवर भागवण्यात आले आहे. पालिकेने दोन वेळा बांधकामाचे लेखापरीक्षण केले, तेव्हा ही शाळा धोकादायक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. पर्यायी जागेची मागणी होऊ लागल्यानंतर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला जागेसाठी पत्र दिले. आमदारांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर शाळेसाठी प्राधिकरणाची मोकळी जागा देण्यात आली. स्थानिक नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, करूणा चिंचवडे आदींनी शाळेसाठी पाठपुरावा केला. वाल्हेकरवाडीतील चिंतामणी चौकात शाळेसाठी पर्यायी इमारत बांधण्याचे काम सुरू झाले. मात्र ते अतिशय संथगतीने सुरू आहे.

पावसाळ्यामुळे धोक्यात वाढ –

नाईलाज म्हणून शाळा धोकादायक असतानाही विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी बसावे लागते. आता पावसाळा सुरू झाल्याने इमारतीचा धोका आणखी वाढला आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून आजूबाजूला लाकडी बांबू लावून घेण्यात आले आहेत. १५ ऑगस्टपर्यंत काहीतरी व्यवस्था केली जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते. प्रत्यक्षात त्यादृष्टीने कार्यवाही होताना दिसत नाही.

शाळा धोकादायक आहे, असे वाटत नाही –

“सदर शाळा धोकादायक आहे, असे वाटत नाही. आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. पर्यायी इमारतीचे काम सुरू आहे, ते रेंगाळलेले नाही. येत्या दीड महिन्यात ते काम पूर्ण होईल. त्यादृष्टीने स्थापत्य विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.” असं पिंपरी पालिका शिक्षण उप आयुक्त संदीप खोत यांनी सांगितलं आहे.