पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दैनंदिन कामकाज एक एप्रिलपासून ई-ऑफिसच्या माध्यमातून डिजिटल झाले आहे. त्यामुळे कामकाज कागदविरहित झाले आहे. विविध विभागांची माहिती संगणकावर अपलोड होते. ही सर्व माहिती निगडीतील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये संग्रहित करून ठेवण्यात येत आहे. त्यात पाच वर्षांचा विदा साठवण्याची व्यवस्था आहे. त्यात आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे.

महापालिकेचे विविध ५२ विभाग आहेत. त्याचे दैनंदिन कामकाज ई-ऑफिस या नवीन संगणक प्रणालीद्वारे सुरू करण्यात आले आहे. दररोज केलेले कामकाज, अभिलेख विभागातील महत्त्वाची कागदपत्रे, नस्तीचे डिजिटायजेशन करण्यात येत आहे. कामकाजासाठी कागदाचा वापर बंद करण्यात आला आहे. संगणकावरील सर्व माहिती एकत्रित करून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडने उभारलेल्या निगडी येथील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये संग्रहित (स्टोअर) करून ठेवण्यात येत आहे. त्यात महापालिकेच्या सर्व विभागांची पाच वर्षांची माहिती सुरक्षितपणे जतन करता येणार आहे.

दैनंदिन कामकाजासह महापालिकेचे महत्त्वाचे दस्तावेज, करारनामे, महत्त्वाची कागदपत्रे, गोपनीय माहिती, नकाशे, शहराचे विविध आराखडे, प्रकल्पांची माहिती, मालमत्ता, शहरातील नागरिकांची माहिती संग्रहित करण्यात आली आहे. ही माहिती सुरक्षित राहावी यासाठी केंद्र सरकारचे सायबर सुरक्षेचे प्रमाणपत्र महापालिकेने घेतले आहे. त्यामुळे डाटा सेंटर पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

हिंजवडीतील ‘डेटा सेंटर’चा वापर बंद

महापालिकेचे ‘डेटा सेंटर’ नव्हते. त्यामुळे महापालिकेची सर्व कागदपत्रे, नस्त्या, महत्त्वाची माहिती हिंजवडीतील एका खासगी कंपनीच्या ‘डेटा सेंटर’मध्ये ठेवण्यात आली आहे. तेथून तो विदा काढून निगडीतील केंद्रामध्ये ठेवला जाणार आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यानंतर हिंजवडीतील डेटा सेंटरचा वापर करणे बंद केला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या सर्व विभागांची माहिती कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये संग्रहित करून ठेवण्यात येत आहे. यात ५२ विभागांचा पाच वर्षांचा विदा ठेवण्याची क्षमता आहे. सायबर हल्ला होऊ नये यासाठी केंद्र सरकारचे सायबर सुरक्षेचे प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. नीळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका —