सांस्कृतिक चळवळीला बळ , स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ, कार्यक्रमांसाठी प्रशस्त वास्तू असावी, यासारखे हेतू ठेवून शहरात चिंचवडचे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहांची उभारणी करण्यात आली. यापुढे सांगवी, प्राधिकरणातही नियोजन आहे. एकीकडे कोटीच्या कोटी रूपये खर्च करून अशी नाटय़गृहे बांधली जात असताना दुसरीकडे नाटय़गृहांमध्ये नाटकेच होत नाहीत, असे चित्र पुढे आले आहे.
शहरातील तीनही नाटय़गृहांमध्ये नाटकांचे प्रयोगच होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याऐवजी कंपन्यांचे सेमिनार, स्नेहसंमेलन, धार्मिक कार्यक्रम, सत्कार कार्यक्रम असेच कार्यक्रम होत आहेत. शहरातील मध्यवर्ती मानले जाणाऱ्या चिंचवड नाटय़गृहातील गेल्या सात महिन्यात तीन नाटकांची संख्या पाहता त्यास पुष्टी मिळते.  एप्रिलमध्ये १८, मे-१६, जून-२४, जुलै-७, ऑगस्ट -९, सप्टेंबर १० असे नाटय़प्रयोग झाले. मावळत्या ऑक्टोबर महिन्यात अवघा एक नाटय़प्रयोग झाला. पिंपरीतील आचार्य अत्रे सुरू झाले, तेव्हापासून हीच ओरड आहे. त्या ठिकाणी नाटक कंपन्या फिरकतच नाही. अत्रे नाटय़गृहाची कायम दुरवस्था राहिली असून पार्किंगची समस्या ही मुख्य डोकेदुखी आहे. वाहने नसणाऱ्या प्रेक्षकांना तेथे पोहोचणे त्रासाचे आहे. सातत्याने ओरड झाल्यानंतर दहा वर्षांनंतर प्रथमच अत्रे रंगमंदिरातील दुरूस्तीचे काम काढण्यात आले व त्यासाठी महिनाभर अत्रे नाटय़गृह बंद ठेवण्यात आले आहे. तब्बल २५ कोटी रूपये खर्चून बांधलेले भोसरीतील नाटय़गृह नाटक कंपन्या, तसेच सांस्कृतिक संस्थांच्या दृष्टीने उपयुक्त असे नाही. त्यामुळे नाटकांची संख्या येथेही कमीच आहे. काही नामवंत नाटकांचे प्रयोग रद्द करण्याची वेळ या ठिकाणी आली. त्याचप्रमाणे, बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावणाऱ्या नाटकांकडे येथील नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. नाटय़गृहांच्या दुरवस्था, प्रशासनाचा भोंगळ कारभार, वाढलेले तिकीट दर, प्रेक्षकांची अनास्था अशी अनेक कारणे सांगितली जातात. ही परिस्थिती सुधारण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri theatres now using just for get together
First published on: 01-11-2014 at 02:56 IST