सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलच्या विद्यासागर दौडची कामगिरी
पुणे : सूरत येथील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अनन्यो भट्टाचार्य आणि पुण्यातील सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलचा विद्यार्थी विद्यासागर दौड या विद्यार्थ्यांनी सुचवलेली नावे ग्रह-ताऱ्यांना देण्यात आली आहेत. एचडी८६०८१ या ताऱ्याला ‘बिभा’ आणि एचडी८६०८१ या ग्रहाला ‘संतमस’ ही नावे देण्यात आल्याची घोषणा अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने मंगळवारी केली.
आंतरराष्ट्रीय खगोल महासंघाच्या (आयएयू) शताब्दी वर्षांनिमित्त ग्रह-ताऱ्यांचे नामकरण करण्याची स्पर्धा जागतिक पातळीवर घेण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून ग्रह-ताऱ्यांना भारतीय भाषांतील नाव सुचवण्यासाठी ‘नेम एक्झोवर्ल्ड्स इंडिया’ स्पर्धा जुलैमध्ये जाहीर करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र, विज्ञानाची गोडी लागावी हा या स्पर्धेचा उद्देश होता. या स्पर्धेत देशभरातून १ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तज्ज्ञ समितीकडून या नावांची छाननी करून १० नावे अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली. अंतिम फेरीत खुले मतदान घेण्यात आले. जवळपास ५ हजार ५८७ नागरिकांनी केलेल्या मतदानानंतर दोन नावे निश्चित करण्यात आली.
त्यात अनन्यो भट्टाचार्यने एचडी८६०८१ या ताऱ्याला ‘बिभा’ हे नाव सुचवले आहे. ‘प्रखर किरण’ असा या नावाचा अर्थ आहे. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. बिभा चौधरी यांच्या स्मरणार्थ हे नाव सुचवण्यात आले होते. तर १३ वर्षांच्या विद्यासागर दौडने एचडी८६०८१ या ग्रहाला ‘संतमस’ हे नाव सुचवले. त्याचा अर्थ ‘ढगांनी आच्छादित’ असा आहे.
अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून भारतीय भाषांमध्ये सुचवण्यात आलेली दोन्ही नावे आंतरराष्ट्रीय खगोल महासंघांने स्वीकारली आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांचा आणि अंतिम फेरीतील स्पर्धकांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.
– डॉ. जी. सी. अनुपमा, अध्यक्ष, अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया