scorecardresearch

आत्मवृत्तांमध्ये पडझडीचा इतिहास लिहिला जावा – महेश एलकुंचवार

संस्थेचे सचिव सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, राजहंस प्रकाशनाचे सदानंद बोरसे या वेळी उपस्थित होते.

आत्मवृत्तांमध्ये पडझडीचा इतिहास लिहिला जावा – महेश एलकुंचवार
आळेकर यांनी पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन केले, तसेच एलकुंचवार यांच्यावरील ‘चिरेबंदी’ हा मोहित टाकळकर दिग्दर्शित चरित्रपट या वेळी दाखवण्यात आला.

‘‘गेल्या काही काळात मराठीत आत्मवृत्तपर पुस्तके खूप आली. अशा पुस्तकांमध्ये त्या व्यक्ती यश नोंदवतात, अपयशाचा मात्र जाता-जाता उल्लेख असतो. मग काही माणसे कधी अयशस्वी झालीच नाहीत का, असा प्रश्न पडतो. आम्हाला माहीतच आहे, तुम्ही यशस्वी आहात ते. पुन:पुन्हा तेच काय सांगता, असे वाटते! कलासिद्धी करताना कुठे फसगत झाली, कोणत्या वाटा तुडवल्या, कोणत्या वाटा टाळल्या, ते सांगा,’’ अशी भावना ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केली.

‘आशय सांस्कृतिक’तर्फे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकरलिखित ‘गगनिका’ या पुस्तकाचे एलकुंचवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. संस्थेचे सचिव सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, राजहंस प्रकाशनाचे सदानंद बोरसे या वेळी उपस्थित होते. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत आळेकरांचे ‘गगनिका’ हे ललितगद्य स्वरूपाचे सदर प्रसिद्ध झाले होते. राजहंस प्रकाशनने ते पुस्तकरूपात आणले आहे.

आळेकर यांच्या ‘बेगम बर्वे’ आणि ‘महानिर्वाण’ या नाटकांचे मूल्य शब्दातीत असून भारतीय रंगभूमीवरील पहिल्या दहा नाटकांमध्ये ती आहेत, असे सांगून एलकुंचवार म्हणाले, ‘‘बरेच नाटककार एक विषय घेऊन त्याभोवती संपूर्ण नाटक गुंफतात. परंतु ‘बेगम बर्वे’मध्ये तीन विसंगत प्रतिमा एकत्र येऊन एक कलाकृती सिद्ध झाली. म्हणूनच मला या नाटकांच्या जन्मकथेबद्दल खूप कुतूहल होते. बाहेरील लोकांना ही नाटके कळत नाहीत, असे काही लोकांना वाटते, पण मराठी नाटक मराठी पद्धतीने केले तरच ते योग्य वाटणे चूक आहे. बाहेरच्या लोकांनाही या नाटकांमधील सत्त्व कळले आहे. आपण मराठी लोकांनीच त्याकडे अधिक उदार मनाने व समजुतीने बघायला हवे.’’

‘कलावंतांनी लेखाजोखा देताना आपल्या अपयशांची चर्चा भरपूर करावी. त्यातून त्यांचा कलात्मक प्रवास कळतो,’ असे एलकुंचवार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘माध्यम हे निर्मात्यापेक्षा नेहमीच मोठे असते. त्यातील अपयशाची नोंद करताना स्वत:कडे नम्रता घ्यावी लागते. हल्ली आत्मनिवेदनांना उतच आला आहे! तिशीतच त्याला सुरुवात होते. जरा पडझड होऊ द्या की! सारखे यशस्वी होण्याइतकी पराभूत करणारी गोष्ट दुसरी नसते. बाहेरच्या लोकांनी दिलेली पावती म्हणजे यश हा मर्यादित दृष्टिकोन आहे. अपयशाची नोंद करणे भारतीय स्वभावातच नाही असे वाटते.’’

 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-05-2017 at 04:31 IST

संबंधित बातम्या