साडेतीन तासांनंतर आग आटोक्यात

पुणे : कोंढवा भागातील पिसोळी परिसरात असलेल्या प्लायवुडच्या गोदामास पहाटे आग लागली. गोदामाशेजारी असलेल्या महावितरणच्या रोहित्राने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. 

 पिसोळी परिसरात दगडे वस्ती येथे प्लायवुडचे गोदाम आहे. गोदामात मोठय़ा प्रमाणावर प्लायवुड ठेवण्यात आले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास गोदामातून मोठय़ा प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती या भागातील नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. प्लायवुडने पेट घेतल्यानंतर आग भडकली. शेजारी असलेल्या महावितरणच्या रोहित्राने पेट घेतल्याने आग भडकण्याची शक्यता होती. अग्निशमन दलाचे १४ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे  केंद्रप्रमुख संजय रामटेके, भिलारे, प्रकाश गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. प्लायवुड तसेच लाकडी साहित्याने पेट घेतल्याने आग आटोक्यात आणणाना अडथळे आले.  नाकातोंडात धूर जाण्याची शक्यता असल्याने आग आटोक्यात आणताना जवानांनी काळजी घेतली. साडेतीन तासांनंतर आग आटोक्यात आली. त्यानंतर जळालेले प्लायवुड धुमसत होते. पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.