स्मार्ट सिटी प्रकल्पात नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शहरातील नागरिकांना दर्जेदार सेवा-सुविधा पुरविण्याचे नियोजन महापालिका करणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांना नावीन्याची जोडही दिली जाणार असून त्यासाठी शहरात ‘नॅशनल सेंटर फॉर अर्बन इनोव्हेशन’ उभारण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पुढील सहा महिन्यात हे काम सुरू होणार असून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
लंडनमधील विविध शहरांमध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा-सुविधा पुरवल्या जातात. त्या पुरवण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा पाहण्यासाठी आयुक्तांनी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांसमवेत नुकताच लंडनचा दौरा केला. त्यांनी तेथील फ्युचर सिटी कॅटाप केंद्राला भेट दिली. त्या पाश्र्वभूमीवर देशातील पहिले ‘इनोव्हेशन सेंटर’ पुण्यात उभारले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
नागरिकांचे दैनंदिन जीवनमान उंचाविण्याच्या हेतूने स्मार्ट सिटी प्रकल्प आखण्यात आला असून त्याचाच भाग म्हणून हे केंद्र उभारले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने शहरांमधील समस्या आणि त्यावरील उपायांचा अभ्यास केला जाईल. तसेच नव्या कल्पनांच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या कल्पना जाणून घेण्यात येतील. नागरी समस्या आणि नव्या कल्पनांमुळे होणारा बदल याचे सविस्तर सादरीकरण झाल्यानंतर त्यांची निवड केली जाणार आहे. अशा कल्पनांवर इतर तज्ज्ञ अभ्यास करतील व त्या अमलात आणल्या जातील. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा या केंद्रात उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
स्थानिक पातळीवर नवनिर्मिती करण्याचा या केंद्राचा मूळ उद्देश आहे. त्याला शहरातील शैक्षणिक संस्था आणि कुशल मनुष्यबळाची मदत होणार आहे. नव्या उद्योगांना (स्टार्टअप्स) हे केंद्र उपयुक्त ठरेल. त्यातून निर्माण होणाऱ्या छोटय़ा प्रकल्पांना साहसी भांडवल (व्हेंचर कॅपिटल) उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे नव्या कल्पनांना बाजारात स्थिरावता येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने हे केंद्र उभारले जाईल. त्याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झालेल्या शहरांसाठी या केंद्राच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. त्यामुळे पुण्यातील हे सेंटर स्मार्ट सिटी हब असेल. याबाबत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना सादरीकरण करण्यात आले आहे. या योजेनेला गती देण्याची सूचना त्यांनी केली आहे, अशीही माहिती आयुक्तांनी दिली.
लंडनमधील वाहतूक व्यवस्थेच्या पाश्र्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी विविध योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नियोजित मेट्रो प्रकल्पासह, पीएमपी, रिक्षा, मोटारी, सायकल यांचा विचार करून संपूर्ण शहराचा र्सवकष वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील काळात टप्प्या-टप्प्याने योजना राबविली जाईल. त्यात वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महापालिकेचा वाहतूक विभाग यांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न राहील.
– कुणाल कुमार, आयुक्त, पुणे महापालिका