वाहतुकीमध्ये पादचारी हा महत्त्वाचा घटक मानून पदपथांवरील मार्गात कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी सर्व खात्यांनी घ्यावी, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी दिले असून पदपथ मोकळे करण्याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच उपाययोजना कराव्यात, असेही आयुक्तांनी सांगितले आहे.
रस्त्यांची तसेच अन्य खात्यांची व शासकीय संस्थांची अनेक कामे शहरात सुरू असतात. या ठिकाणी खोदाईकाम तसेच कामापूर्वी साधनसामग्री बहुतांश वेळी पदपथावर टाकली जाते. त्यामुळे पादचाऱ्यांना मोठा अडथळा होतो. अशावेळी पादचारी पदपथाऐवजी रस्त्यांचा वापर चालण्यासाठी करतात. त्यातून काही वेळा गंभीर अपघातही घडतात. अशावेळी महापालिकेवर टीका होते तसेच महापालिका सेवकांच्या कामकाज क्षमतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्या अनुषंगाने पदपथ मोकळे राहतील याची काळजी सर्व खातेप्रमुखांनी घ्यावी, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
पादचारी हा महत्त्वाचा घटक मानून पादचारी मार्गातील सर्व अडथळे दूर करावेत, त्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी व उपाययोजना कराव्यात, जेथे खोदाई केली जात असेल ती जागा योग्य पद्धतीने संरक्षित करावी, कामाच्या माहितीचे फलक लावावेत, कामे सुरू असताना पादचाऱ्यांसाठी पर्यायी व सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावेत, त्याशिवाय खोदाईची परवानगी देऊ नये अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, विविध कंपन्या, संस्था, गॅरेजचालक, पेट्रोल पंपचालक, टपऱ्या, छोटी-मोठी दुकाने यांच्या अतिक्रमणांसह राज्य शासन, निमशासकीय स्वायत्त संस्था आदी कार्यालयांची पदपथांवरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात यावीत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
खोदाई अथवा अन्य कामे सुरू असताना पादचाऱ्यांच्या सुरक्षितेबाबत काही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित खाते, तसेच क्षेत्रीय कार्यालय, संबंधित तांत्रिक-अतांत्रिक कर्मचारी व खाते प्रमुख यांची राहील, असेही आयुक्तांनी बजावले आहे. महापालिकेव्यतिरिक्त अन्य संस्था, व्यावसायिक, मिळकतधारक, कंपन्या यांनी लेखी परवानगीशिवाय काम केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल तसेच दुरुस्तीही करून घेतली जाईल, असे कळवण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांना दिलेले आदेश
– पदथांवरील सर्व अतिक्रमणे काढा
– काम सुरू असेल, तर पर्यायी व्यवस्था करा
– पदपथांसाठी स्वतंत्र पथक तयार करा
– नियमितपणे व सातत्याने कार्यवाही करा