महापालिका शाळांमध्ये वीजअटकाव यंत्रणा बसवण्यासाठी केल्या जाणाऱ्या तब्बल चार कोटींच्या खर्चावर स्वयंसेवी संस्थांकडून जोरदार टीका झाल्यानंतर अखेर या यंत्रणेबाबत आता अनेक आक्षेप उपस्थित करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनालाही या खर्चाबाबत तसेच अन्य आक्षेपांबाबत समाधानकारक उत्तरे देता येत नसल्यामुळे अखेर हा प्रस्ताव स्थगित ठेवण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.
महापालिका शाळांमध्ये वीजअटकाव यंत्रणा बसवण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेमध्ये ठेकेदार, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमताने गैरव्यवहार केल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनानेच सर्व नियम धाब्यावर बसवल्यामुळे ही यंत्रणा खरेदी करताना महापालिकेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होणार असून, एका विशिष्ट ठेकेदारासाठी हा खर्च केला जात असल्याचीही तक्रार आहे. या तक्रारीमुळे यंत्रणा खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आल्यानंतर त्याबाबत मंगळवारी अनेक आक्षेप उपस्थित करण्यात आले. मात्र, त्याबाबत प्रशासनाकडून माहिती मिळाली नाही. ही यंत्रणा दोन शाळांमध्ये बसवल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात त्या शाळेत अशी कोणतीही यंत्रणा बसवलेली नाही. हा काय प्रकार आहे, अशीही विचारणा या वेळी करण्यात आली. त्याबाबतही खुलासा करण्यात आला नाही. त्यामुळे हा नक्की काय प्रकार आहे, ही यंत्रणा बसवली गेली होती किंवा कसे याची माहिती प्रशासनाने द्यावी तसेच संपूर्ण प्रस्तावाबाबत तसेच उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांबाबतही माहिती द्यावी, अशी सूचना स्थायी समितीने प्रशासनाला दिली आहे.
ही यंत्रणा महापालिका शाळांच्या इमारतींवर बसवण्यात येणार असली तरी त्या ठिकाणी नक्की कोणत्या प्रकारची यंत्रणा बसवणे आवश्यक आहे आणि ज्या प्रकारची यंत्रणा बसवली जाणार आहे ती तेथे आवश्यक आहे का याचा कोणताही अभ्यास शिक्षण मंडळाने किंवा महापालिकेने केलेला नाही. एका इमारतीसाठी बसवली जाणारी ही यंत्रणा अधिकात अधिक पन्नास ते साठ हजारांना उपलब्ध असताना ती प्रत्येकी सव्वाचार लाख रुपयांना खरेदी केली जाणार आहे.

स्थायी समितीमध्ये या यंत्रणेबाबत अनेक आक्षेप उपस्थित करण्यात आल्यानंतर त्याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. तसेच शिक्षण मंडळ आणि महापालिका प्रशासन या दोन स्तरावरून हा विषय आल्यामुळे निश्चित माहिती कोणीच दिली नाही. त्यामुळे सर्वानुमते हा विषय आम्ही पुढे ढकलला.
बापूराव कर्णे गुरुजी, अध्यक्ष, महापालिका स्थायी समिती