पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी होत असलेल्या मतदानावेळी प्रभाग क्रमांक २२ मध्ये एक अजब प्रकार पाहायला मिळाला. याठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार व माजी महापौर चंचला कोदे आणि उपमहापौर बंडू गायकवाड यांनी चक्क मतदान यंत्राची पूजा केली. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून राजकीय कार्यकर्त्यांना इतक्या संख्येने मतदान यंत्राजवळ का जाऊन देण्यात आले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे महापालिकेचे निवडणूक निर्णय आधिकारी सतीश कुलकर्णी यांनी याप्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासून आतापर्यंत शहरातील विविध भागात पैसे वाटण्याच्या,गाड्या फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आजच्या मतदान यंत्राची पूजा करण्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आता निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात कशाप्रकारची भूमिका घेण्यात येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामासाठीचा प्रचार संपल्यानंतर आज (मंगळवार) निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. शहरात २६ लाख ३४ हजार ८०० मतदार असून ४१ प्रभागांतून १६२ जागांसाठी एक हजार ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीच्या प्रशासकीय पातळीवर अनेकविध प्रयत्न करण्यात आले असून मतदानाची टक्केवारी वाढणार का, याचीही उत्सुकता आहे.
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी जोरदार चुरस असून मतदार ‘परिवर्तन’ घडविणार की सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारडय़ात मते टाकणार हेही मतदानावर अवलंबून राहणार आहे. महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत सत्ता आहे. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळवून हॅटट्रिक साधण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असून कारभारी बदलाची हाक देत भाजपला परिवर्तनाची अपेक्षा आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc elections 2017 candidate perform pooja of voting machine in pune
First published on: 21-02-2017 at 13:30 IST