पालिकेच्या सर्व विभागांकडून रीतसर परवानगी घेतल्याचा संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा दावा

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील मुद्रणालयाच्या वास्तूचे सभागृहामध्ये रूपांतर करण्यासाठी सुरू असलेले बांधकाम थांबविण्यासाठी महापालिकेच्या वारसा वास्तू विभागाने (हेरिजेट सेल) नोटीस बजावली आहे. मात्र, महापालिकेच्या सर्व विभागांकडून रीतसर परवानगी घेऊनच बांधकाम केले असून ते अधिकृत असल्याचा दावा संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी केला.

भांडारकर संस्थेतील मुख्य कार्यालय, निझाम वसतिगृह आणि मुद्रणालय या तीन इमारतींची ‘ग्रेड १’ या अंतर्गत हेरिटेज वास्तू अशी नोंद झालेली आहे. सरकारच्या नियमांनुसार हेरिटेज वास्तू पाडून त्याजागी कोणत्याही स्वरूपाचे नवे बांधकाम करता येत नाही. या वास्तूच्या मूळ रचनेला धक्का न लावता इमारतीची डागडुजी आणि देखभाल व दुरुस्तीचे काम करता येते. मात्र, भांडारकर संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने मुद्रणालयाची वास्तू असलेल्या जागेवर सभागृह उभारण्याचे काम सुरू केले असून त्याला भारिप-बहुजन महासंघाचे प्राचार्य म. ना. कांबळे यांनी आक्षेप घेतला होता.  त्याची दखल घेत महापालिकेच्या वारसा वास्तू विभागाने कोणत्याही नवीन बांधकामास संस्थेस परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करीत नव्या इमारतीचे बांधकाम त्वरित बंद ठेवण्यात यावे, असे आदेश देणारी नोटीस संस्थेच्या सचिवांना बजावली.

प्राचार्य म. ना. कांबळे यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार संस्थेला अशा स्वरूपाची नोटीस मिळाली होती हे पटवर्धन यांनी मान्य केले. मात्र, त्यानंतर बैठकीमध्ये वारसा वास्तू विभागाने संस्थेची बाजू ऐकून घेऊन परवानगी दिली होती. सभागृहाच्या बांधकामाला कोणताही आक्षेप नव्हता. त्याला लागून असलेल्या छोटेखानी खोलीच्या (कॉन्फरन्स रूम) बांधकामाला परवानगी नसल्याचा दावा केला जात होता. मात्र, त्याबाबतचा प्रश्नदेखील सुटला असून या बांधकामाला महापालिकेच्या बांधकाम विभागाची मंजुरी आहे. त्याचप्रमाणे वारसा वास्तू विभाग आणि बांधकाम विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. त्यामुळे संस्थेने कोणत्याही स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असेही पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

‘भांडारकर’चा गुरुवारी वर्धापनदिन

प्राच्यविद्या संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नावलौकिक संपादन केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचा गुरुवारी (६ जुलै) वर्धापनदिन आहे. शताब्दी वर्षांची सांगता होत असताना संस्थेने नियामक मंडळाची निवडणूक बिनविरोध करताना नवे प्रकल्प हाती घेतले आहेत. गुरुवारच्या बैठकीत नियामक मंडळ आणि कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे, असेही भूपाल पटवर्धन यांनी सांगितले.