पुणे महानगरपालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे उद्घाटन गुरुवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते पार पडले. दरम्यान, पुणे शहरात जोरदार पाऊस झाला. यावेळी उद्घाटनाचा कार्यक्रम सुरु असतानाच सभागृहाच्या डोममधून पावसाचे पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी सभागृहात पाणी साचू नये म्हणून बादल्या ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. मात्र, त्यामुळे नव्या बांधकामाच्या दर्जाबाबत सभागृहात चर्चा सुरु होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, नॅशनल शिपिंग बोर्डचे अध्यक्ष प्रदीप रावत आदी मान्यवर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, पावसाचे पाणी टपकत असल्याने व्यासपीठावरील मान्यवर त्याकडे पाहण्यापलिकडे काहीही करू शकत नव्हते. कामे अर्धवट असताना नव्या इमारतीचे उदघाटन होता कामा नये अशी मागणी विरोधकांनी अनेक वेळा केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही नामुष्कीची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. आता या निकृष्ट दर्जाच्या कामावर सत्ताधारी भाजपा काय कारवाई करते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे. पुणे महानगरपालिकेचा मुख्य इमारतीच्या बाजूला भव्य इमारत उभारण्यात आली आहे. त्यामध्ये दुमजली बेसमेंट पार्किंग अधिक चार मजले अशा स्वरुपाचे इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून वापरासाठी एकूण सुमारे १४ हजार चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध झाले आहे.

तळमजल्यावर सर्व विभागांसाठी एकत्रित नागरिक सुविधा केंद्र, एक खिडकी योजना कक्ष, पोस्ट ऑफिस, बँक एटीएम, पीएमपीएमएल पास केंद्र या सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर विविध पक्ष कार्यालये व नगरसचिव कार्यालय करण्यात आली आहेत. दुसऱ्या मजल्यावर सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, विरोधी पक्षनेता व विविध समिती अध्यक्षांची दालने तसचे स्थायी समिती सभागृह, इतर विषय समिती सभागृह, पत्रकार कक्ष व विविध पक्ष पदाधिकारी कार्यालय बांधण्यात आली आहेत.

तिसर्‍या मजल्यावर ७२ फूट व्यासाचे घुमटाकार मुख्य सभेच्या सभागृहाचे आणि महापौर दालनाचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य सभेच्या सभागृहासाठी, जीआरसी मटेरियलचा गोलाकार घुमट करण्यात आला असून घुमटाची उंची फ्लोअरपासून सुमारे ६० फूट इतकी आहे. नवीन सभागृहामध्ये २२४ सभासदांना बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये १८० नागरिकांसाठी आसन व्यवस्था केलेली आहे. महापौर यांच्या डायसच्या मागील बाजूस ५० अधिकारी आणि त्यावरील मजल्यावर ५० पत्रकारांसाठी कक्षाची रचना करण्यात आली आहे. आजपर्यंत या कामासाठी सुमारे ४८ कोटी ७५ लाख रुपये इतका खर्च आला आहे. या इमारतीचे बांधकाम सव्वा तीन वर्षांत पूर्ण करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc in the inauguration ceremony of the new building the roof has begun leak due to the rains
First published on: 21-06-2018 at 18:12 IST