पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मुसंडी मारून सत्ता काबीज करणाऱ्या भाजपसाठी आजचा महापौरपदाच्या निवडणुकीचा दिवस ऐतिहासिक म्हणावा लागेल. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर झाला आहे. महापौरपदी मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे. त्यांना ९८ मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार नंदा लोणकर यांना ५२ मते मिळाली. शिवसेनेने तटस्थ राहणे पसंत केले.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. निवडणुकीत १६२ पैकी भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले आहेत. स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार हे निश्चितच होते. राष्ट्रवादी काँग्रेसला ४०, शिवसेना १० आणि मनसेला अवघ्या दोन जागा जिंकण्यात यश आले. भाजपकडून मुक्ता टिळक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर यांची उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज महापालिका सभागृहात महापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. अपेक्षेप्रमाणे महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक विजयी झाल्या. मुक्ता टिळक यांना ९८ मते मिळाली. तर नंदा लोणकर यांना ५२ मते मिळाली. शिवसेनेचे दहा नगरसेवक तटस्थ राहिले. दोन जागा जिंकणाऱ्या मनसेने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे एमआयएमच्या येरवड्यातील एकमेव नगरसेवक अश्विनी लांडगे यांनी महापौरपदासाठी नंदा लोणकर यांना मतदान केले. दरम्यान, मुक्ता टिळक यांनी ४६ मतांनी विजय मिळवून महापौरपदाची निवडणूक जिंकली. निवडणुकीनंतर महापौरपदी विजयी झालेल्या मुक्ता टिळक यांचे खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी महापौर प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, गटनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार यांनी अभिनंदन केले.

तत्पूर्वी, शिवसेनेने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. शिवसेनेकडून संगीता ठोसर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी आज सकाळी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. तसेच महापौरपदाच्या निवडणुकीत थेट भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक यांना मतदान न करता तटस्थ राहणेच पसंत केले. तर मनसेच्या दोन नगरसेवकांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी सकाळी महापालिकेत येऊन सही करून बाहेर पडले. तर एमआयएमच्या नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या महापौरपदाच्या उमेदवार नंदा लोणकर यांना मतदान केले.

उपमहापौरपदी नवनाथ कांबळे 

उपमहापौरपदी भाजपच्या नवनाथ कांबळे यांची निवड झाली. नवनाथ कांबळे यांना ९८, तर काँग्रेसच्या लता राजगुरू यांना ५२ मते मिळाली. त्यापूर्वी उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून शिवसेनेने माघार घेतली. तसेच निवडणुकीवेळी तटस्थ राहणे पसंत केले.