अनेक इमारतींमध्ये यंत्रणा नसल्याची पालिकेची कबुली

पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा (रेन वॉटर हार्वेस्टिंग) इमारतींवर बसविण्याबाबत महापालिकेचे धोरण कुचकामी असून दस्तुरखुद्द पालिकेच्या विविध इमारतींमध्ये ही यंत्रणा अद्यापही बसविण्यात आली नसल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे. शहर आणि परिसरातील नव्या इमारतींना पूर्णत्वाचा दाखला देत असताना पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा बसविण्याचा नियम आहे. मात्र महापालिकेच्या इमारतींवरच ही यंत्रणा नसल्याने पालिकेने इतर इमारतींना नियम सांगण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.

शहरी भागात पावसाचे पाणी हा पिण्याच्या पाण्याचा आणि इतर वापरांचा मुख्य स्त्रोत आहे. तसेच जमिनीखालील पाणी हा देखील अतिरिक्त मुख्य स्त्रोत आहे. पावसाची अनियमितता, जमिनीखालील पाण्याचा अमर्याद उपसा अशा विविध कारणांमुळे पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली असून त्यानुसार इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवणे, त्याचा उपयोग करणे, जमिनीत मुरवणे अशा उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आले आहे. ही यंत्रणा जोवर इमारतींवर बसविण्यात येत नाही तोवर इमारतींना पूर्णत्वाचा दाखला देण्यात येऊ नये असे परिपत्रक काढण्यात आले आहे.

महापालिकेच्या इमारतींमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा बसविण्यात आली आहे किंवा नाही, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्त्यां कनिज सुखरानी यांनी महापालिकेकडे विचारणा केली होती.

पालिकेच्या केवळ सात इमारतींवर ही यंत्रणा असल्याचे स्पष्ट झाले. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर याबाबत २४ मे २०१६ मध्ये महापालिकेने अंदाजपत्रकात १.७५ कोटी रुपयांची तरतूद केली असून चालू वर्षांत ७४ इमारतींपैकी ५५ इमारतींवर ही यंत्रणा बसवण्यात आली असून ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय, राजर्षी शाहू महाराज नाटय़गृह (हडपसर), थोरवे शाळा आणि क्षेत्रीय कार्यालय (धनकवडी), कसबा क्षेत्रीय कार्यालय, डोळ्यांचे रुग्णालय (औंध), आनंद पार्क बहुउद्देशीय सभागृह आणि बॅडमिंटन हॉल (धानोरी) येथे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. तर सुभेदार आंबेडकर शाळा (नगर रस्ता), मावळे दवाखाना आणि हमालवाडा पार्किंग(नारायण पेठ), गाडगीळ शाळा (शनिवार पेठ), आंबेडकर मुलांचे वसतिगृह (शिवाजीनगर), राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळा (मुंढवा), हकीम अजमल खान उर्दु शाळा (येरवडा), राजेंद्र प्रसाद शाळा (बोपोडी), महिला भवन (पाषाण), महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले शाळा (ढोले पाटील रस्ता)आणि अण्णा भाऊ पाटील शाळा (कोथरुड) येथे अद्यापही ही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही.

महापालिकेच्या स्वत:च्या इमारतींमध्ये ही यंत्रणा नसताना प्रशासनाला इतर इमारतींना ही यंत्रणा आवश्यक करण्याचा नैतिक अधिकार नाही. पालिका प्रशासनच जर नियमांचे पालन करत नसेल तर सामान्य नागरिकांकडून नियम पाळण्याची अपेक्षा का बाळगावी. पालिकेच्या इमारतींवर ही यंत्रणा उभी करुन शहरातील इतरांना उद्युक्त करावे.

– कनिज सुखरानी, माहिती अधिकार कार्यकर्त्यां