अवघ्या सहा महिन्यांपूर्वी उत्तम प्रकारे डांबरीकरण करून तयार करण्यात आलेला तळजाई मंदिराकडे जाणारा रस्ता उखडून तो सिमेंटचा करण्याचा घाट महापालिकेने घातला असून, चांगल्या स्थितीत असलेला हा रस्ता कशासाठी उखडण्यात आला, असा प्रश्न तळजाईवर फिरायला जाणारे शेकडो नागरिक सध्या रोज विचारत आहेत. त्या बरोबरच सार्वजनिक निधीचा अशा प्रकारे सुरू असलेला अपव्यय पाहून जागरूक नागरिक हळहळही व्यक्त करत आहेत.
शिंदे हायस्कूल जवळून तळजाईकडे जाणारा रस्ता सुरू होतो. हा रस्ता घाटाचा असून सध्या तो उखडण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. मुळातच हा रस्ता पहिल्यापासूनच चांगला होता. या रस्त्यावर कधी खड्डेही पडले नव्हते. मात्र सहा महिन्यांपूर्वी या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम करण्यात आले होते. त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता अधिकच वाढली. डांबरीकरणाबरोबरच इथे मार्गदर्शक फलक, चिन्हे, विजेचे खांब ही कामेही पूर्ण करण्यात आली. मात्र इथवरच थांबेल तर ती महापालिका कसली. हाच रस्ता सध्या रोज उखडला जात असून त्यांचे काँक्रिटीकरण केले जात आहे.
हे काम पाहून तळजाईवर व्यायामासाठी जाणारे शेकडो नागरिक तसेच या भागातून अन्यत्र जाणारे वाहनचालक आश्चर्य व्यक्त करत आहेत. मुळातलाच रस्ता एवढा चांगला होता, की तो उखडून पुन्हा सिमेंटचा करण्याचे काहीही कारण नव्हते. तरीही रस्ता रोज वेगाने उखडला जात आहे आणि सध्या अध्र्या भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे. उर्वरित भागाचेही काँक्रिटीकरण होणार असले, तरी मुळातच या कामाची आवश्यकता नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेकडे सध्या अनेक विकासकामांसाठी निधी नसल्याने ती कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. अशा परिस्थितीत आवश्यक कामांवर निधी खर्च होणे आवश्यक असताना तो न करता चांगला रस्ता उखडून तेथे काँक्रिटीकरणाची काय आवश्यकता होती असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2015 रोजी प्रकाशित
उत्तम दर्जाचा रस्ता उखडून काँक्रिटीकरणाचा अट्टहास
चांगल्या स्थितीत असलेला हा रस्ता कशासाठी उखडण्यात आला, असा प्रश्न तळजाईवर फिरायला जाणारे शेकडो नागरिक सध्या रोज विचारत आहेत.

First published on: 28-05-2015 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc road taljai concretization