महापालिकेच्या जुन्या शाळा विकसकांच्या घशात घालण्याचे प्रकार सर्रास घडतात. पुणे महापालिकेने मात्र जुन्या शाळेचे जतन करून शाळेचे नूतनीकरण तसेच सुशोभीकरणही केले आहे. वारसा जपण्याचे हे काम आदर्श ठरावे असेच आहे, अशा शब्दांत शर्मिला ठाकरे यांनी बुधवारी महापालिकेचे कौतुक केले.
प्रभाग क्रमांक १२ मधील वीर नेताजी पालकर विद्यालय आणि हुतात्मा बालवीर शिरीषकुमार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त या शाळेचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, सामाजिक कार्यकर्त्यां रेणूताई गावस्कर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष रिटा गुप्ता, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ, मनसेचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेडगे, प्रकाश ढेरे आणि स्थानिक नगरसेविका नीलम कुलकर्णी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महापालिकेने शाळेची जुनी इमारत न पाडता वारसा व जुन्या इमारतीची वैशिष्टय़े जपली आहेत. तसेच इमारतीचे नूतनीकरण केले आहे. शाळा सुसज्ज असून हे वेगळ्या पद्धतीचे काम पाहून मला आनंद झाला. या कामाची संकल्पना नीलम कुलकर्णी आणि महापालिका शिक्षण मंडळाची असून त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे ठाकरे या वेळी म्हणाल्या.
गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होईल अशा पद्धतीचे शिक्षण महापालिका शिक्षण मंडळातर्फे दिले जाते, तसे उपक्रम राबवले जातात, असे महापौर धनकवडे यांनी यावेळी सांगितले. शिक्षणाचा हक्क वंचितांपर्यंत पोहोचला पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांना हा हक्क मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या शाळा उपयुक्त ठरू शकतात, असे रेणूताई गावस्कर यांनी सांगितले. शालांत परीक्षेत या शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी ८५ टक्क्य़ांवर गुण मिळवले असून या विद्यार्थ्यांचा सत्कारही कार्यक्रमात करण्यात आला. अध्यक्ष धुमाळ यांचेही भाषण झाले. जितेंद्र राठी यांनी सूत्रसंचालन, तर नीलम कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2015 रोजी प्रकाशित
जुनी शाळा जतन करण्याचे महापालिकेचे काम आदर्श
महापालिकेच्या जुन्या शाळा विकसकांच्या घशात घालण्याचे प्रकार सर्रास घडतात. पुणे महापालिकेने मात्र जुन्या शाळेचे जतन करून शाळेचे नूतनीकरण तसेच सुशोभीकरणही केले आहे.

First published on: 18-06-2015 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc school sharmila thackeray renovation