कोथरूड, बावधन, बाणेर, औंध परिसरातील नाल्यांच्या साफसफाईच्या कामांची पाहणी महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केली. त्यापैकी बावधन आणि पौड रस्त्यावरील कल्व्हर्टजवळील कामे दोन दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिले.

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाले सफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला दिले होते. स्थायी समितीनेही या कामांसाठी तब्बल ९८ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेला मान्यता दिली आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील विशेषत: उपनगरातील नाल्यांची साफसफाईची कामे सध्या सुरू आहेत. त्याअंतर्गत कोथरूड, बावधन, बाणेर आणि औंध परिसरातील कामांची पाहणी महापौर मुक्ता टिळक यांनी केली. आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सह महापालिका आयुक्त जयंत भोसेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह स्थानिक नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

बाणेर येथील मुरकुटे गार्डनजवळ मुंबई-बेंगलोर महामार्गालगत हुंडाई शोरूम आणि पॅनकार्ड क्लब रस्त्या नजीकच्या नाल्यांची पाहणी करताना दोन दिवसांमध्ये सर्व कामे पूर्ण करावीत, असे टिळक यांनी स्पष्ट केले. औंध क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण २९.१५ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. त्यापैकी २२.२० किलोमीटर लांबीच्या नाल्यांची साफसफाई करणे आवश्यक असते. ही सर्व कामे पूर्ण करण्यात आल्याचा दावा यावेळी अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. तर या भागातील ३९ कल्व्हर्टपैकी ३६ कलव्हर्टची साफसफाई झाली असून कोथरूड-बावधन कार्यालयाअंतर्गत एकूण १६.८५० किलोमीटर लांबीचे नाले आहेत. त्यापैकी १३.५७५ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची साफसफाई आणि दुरुस्तीची कामे झाली असून ८.७ किलोमीटर लांबीची कामे सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून महापौरांना देण्यात आली.