महापालिकेच्या मुख्य सभेत सत्ताधारी काँग्रेस, तसेच मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी बुधवारी वेगवेगळ्या विषयांबाबत ज्या भूमिका घेतल्या, त्या पाहून पालिका सभा म्हणजे बालिशपणाचे संमेलन असा प्रकार झाला. या पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या हास्यास्पद मागण्यांनीही सभेत अनेकदा करमणूकही झाली.
सभेत वाद सुरू झाला तो महापालिका हद्दीत आणखी सहा गावे समाविष्ट करण्याच्या मुद्यावर. महापालिका हद्दीत २८ गावे समाविष्ट करावीत, असा निर्णय राज्य शासनाने पूर्वीच घेतलेला आहे. त्यात आणखी सहा गावांची वाढ करण्याबाबत शासनाने महापालिकेचे मत मागवले होते. ही गावे महापालिकेत समाविष्ट करावीत, असा प्रस्ताव सभेपुढे येताच त्याला काँग्रेस आणि मनसेने जोरदार विरोध केला. मात्र, हा विरोध फारच तकलादू होता. शासनाचे पत्र कक्ष अधिकाऱ्याकडून आलेले आहे. त्यामुळे ते ग्राह्य़ होऊ शकत नाही, अशी हरकत काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी घेतली. त्याबाबत आयुक्तांनी वारंवार खुलासा केल्यानंतरही शिंदे याच मुद्यावर घालत राहिले.
या वादावरून काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशीही शाब्दिक चकमक झडली. मनसेच्या सदस्यांकडूनही या वेळी फक्त अडवणूक म्हणून अधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले जात होते, मात्र त्यात काही तथ्य नव्हते.
पीएमपीच्या जागा विकसित करण्यासाठी अडीच चटईक्षेत्र निर्देशांक मंजूर करावा, असा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी मांडला होता. तो मुख्य सभेने नव्वद दिवसांत मंजूर न केल्यामुळे आयुक्तांनी कायद्यातील तरतुदीनुसार स्वत:च्या अधिकारात मंजूर करून तो राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला आहे. ही बाब आयुक्तांनी सभेच्या फक्त अवलोकनासाठी पाठवली होती. हे पत्र सभेत पुकारले जाताच मनसे, भाजप आणि शिवसेनेने त्यावर मतदानाचा आग्रह धरला. वास्तविक, जो निर्णय आयुक्तांनी आधीच घेतलेला आहे आणि जो विषय सभेच्या फक्त माहितीसाठी पाठवलेला आहे, त्यावर मतदान मागणे हा कमालीचा बालिशपणा होता. तरीही या तीन पक्षांनी या विषयात तासभर वाद घालून सत्ताधारी राष्ट्रवादी बरोबर जोरदार वादावादी केली, आरोप-प्रत्यारोपही झाले.
‘सीबीएससी’च्या इतिहास अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांवर फक्त चारच ओळींची माहिती देण्यात आली आहे. तसेच मराठय़ांचा इतिहासही वगळण्यात आला आहे. या प्रकाराचा ही सभा तीव्र निषेध करत आहे, असा प्रस्ताव मुक्ता टिळक, अशोक येनपुरे, अशोक हरणावळ आदींनी दिला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी पुकारला जाताच मनसेच्या किशोर शिंदे यांनी जोरदार हरकत घेत आधी या विषयाची माहिती आम्हाला द्या, असा आग्रह प्रशासनाकडे धरला. हा नगरसेवकांनीच दिलेला प्रस्ताव होता. त्यामुळे त्याची माहिती आयुक्त कसे देणार ही साधी बाबही या वेळी मनसेने लक्षात घेतली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2013 रोजी प्रकाशित
महापालिका सभा नव्हे; बालिशपणाचे ‘संमेलन’
महापालिकेच्या मुख्य सभेत सत्ताधारी काँग्रेस, तसेच मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी ज्या भूमिका घेतल्या, त्या पाहून पालिका सभा म्हणजे बालिशपणाचे संमेलन असा प्रकार झाला.

First published on: 19-12-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc shiv sena bjp mns general body meeting