महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसबरोबरच शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्ज भरल्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय होणार, कोणता पक्ष कोणाला मदत करणार, अशी राजकीय चर्चा रंगली आहे. या दोन पक्षांबरोबरच भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतर्फेही अर्ज भरण्यात आला असून मनसेने अर्ज भरलेला नाही.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी (५ मार्च) निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत काँग्रेसतर्फे रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अश्विनी कदम आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतर्फे मुक्ता टिळक यांचे अर्ज दाखल झाले. सन २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी झाली आणि हे पक्ष सत्तेत आले.
या पक्षांमध्ये झालेल्या अलिखित करारानुसार पाच वर्षांपैकी चार वर्षे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार होते आणि चौथ्या वर्षांतील अध्यक्षपद काँग्रेसला दिले जाणार होते. या निर्णयानुसार यंदाचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळणे अपेक्षित असले, तरी शुक्रवारी राष्ट्रवादीनेही अर्ज भरल्यामुळे तो पक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार याबाबत आता आडाखे बांधले जात आहेत. सोळा सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्रेस, मनसे आणि भाजपचे प्रत्येकी तीन तर शिवसेनेचा एक सदस्य आहे. यापूर्वी सन २०११-१२ मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला मदत केली होती आणि भाजपचे गणेश बीडकर अध्यक्ष झाले होते. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून भाजपची वा मनसेची मदत घेतली जाऊ शकते
मदत करणाऱ्यांना अध्यक्षपद – जगताप
काँग्रेसने पाचव्या वर्षीचे अध्यक्षपद घ्यावे अशी आमची भूमिका आहे. त्या दृष्टीने त्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर आम्ही यंदाचे अध्यक्षपद इतर एखाद्या पक्षाच्या मदतीने घेऊ व जो पक्ष आम्हाला मतदानात मदत करेल, त्या पक्षाला पुढच्या वर्षीचे अध्यक्षपद आम्ही देऊ, अशी भूमिका सभागृहनेता सुभाष जगताप यांनी शुक्रवारी जाहीर केली.
पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील – शिंदे
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्ज भरला आहे. त्याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींना माहिती दिली असून ते चर्चा करून निर्णय घेतील, असे विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे यांनी सांगितले.