पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून (पीएमआरडीए) मावळ तालुक्यातील कुसगांव खुर्द येथील सर्वेक्षण क्रमांक २५६ मधील वाणिज्य स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून १३०० चौरस फूट वाणिज्य स्वरूपाचे अनधिकृत गाळे पाडण्यात आले. अनधिकृत बांधकामधारकाला ‘बांधकाम थांबविण्याची नोटीस’ बजाविण्यात आली होती. या नोटिशीला न जुमानता बांधकाम सुरूच ठेवण्यात आले होते. त्यामुळे पीएमआरडीएकडून ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकाम पाडकामाचा खर्च संबंधित बांधकामधारकाकडून वसूल केला जाणार आहे. पीएमआरडीए क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यापूर्वी रीतसर परवानगी घेऊनच बांधकाम करावे. नागरिकांनी देखील सदनिका खरेदी करताना संबंधित बांधकामधारकाने परवानगी घेतली आहे किंवा कसे, याबाबत खातरजमा करावी, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.