‘प्रेमस्वरूप आई’ या कवितेने अजरामर झालेले, मराठी कवितेच्या प्रसारासाठी स्थापन झालेल्या ‘रविकिरण’ मंडळातील लोकप्रिय कवी, उर्दू-फारसीचे अभ्यासक आणि गझल या काव्यप्रकाराची मराठी वाङ्मयामध्ये समर्थपणे भर घालणारे ज्येष्ठ कवी माधव ज्यूलियन उर्फ साहित्यिक माधवराव पटवर्धन हे मराठी साहित्यातील पहिल्या डी. लिट. पदवीचे मानकरी ठरले आहेत. मुंबई विद्यापीठाने त्यांना हा बहुमान देण्याचा निर्णय घेतला होता, त्या घटनेला रविवारी (१ डिसेंबर) ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी प्रा. माधव त्रिंबक पटवर्धन यांना ‘छंदोरचना’ या ग्रंथाबद्दल डी. लिट. पदवी देण्याचा निर्णय घेतला. ग्रंथाला डॉक्टरेट देण्याची ही मराठीतील पहिली घटना आहे. त्याबरोबरच मराठी वाङ्मयाला हा बहुमान मिळवून देणारे माधव ज्यूलियन हे पहिलेच साहित्यिक ठरले आहेत. विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात माधव ज्यूलियन यांना डी. लिट. प्रदान करण्यात आली. या बहुमानानंतर अवघ्या काही महिन्यांतच म्हणजेच २९ नोव्हेंबर १९३९ रोजी माधव ज्यूलियन यांचे निधन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेने संस्थेच्या सभागृहाचे माधवराव पटवर्धन सभागृह असे नामकरण करून माधव ज्यूलियन यांच्या वाङ्मयीन कार्याची स्मृती जतन केली आहे.
माधवराव पटवर्धन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी बडोदा येथे झाला. फारसी आणि इंग्रजी साहित्याचे अभ्यासक असलेल्या माधव ज्यूलियन यांनी १९१८ ते १९२४ या कालखंडात फग्र्युसन महाविद्यालय येथे अध्यापन केले. ‘गॉडस गुड मेन’ या इंग्रजी कादंबरीतील नायिकेच्या व्यक्तिरेखेवरून त्यांनी ‘ज्यूलियन’ हे नाव धारण केले. चार वर्षे माध्यमिक शिक्षक म्हणून काम केल्यानंतर कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालय येथे ‘फारसी’ विषयाचे अध्यापन केले. फारसी-मराठी शब्दकोशाचे जनक, ‘सुधारक’ आणि ‘विरहतरंग’ या खंडकाव्याचे निर्माते ही त्यांची साहित्य संपदा आहे.