ओतूर येथील नंदकरी वस्तीतील घटना

मिठाईतून विषबाधा झाल्याने एकाच कु टुंबातील तीन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ओतूर येथे घडली. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने ओतूर येथील नंदकरी वस्तीत शोककळा पसरली.

अनिल बाळू फुलमाळी (वय ८), त्याचा लहान भाऊ साईराज (वय ५) आणि धनराज (वय ४) अशी मृत्युमुखी पडलेल्या भावंडाची नावे आहेत. त्यांची मोठी बहीण गौरी (वय १२) आणि पूजा (वय १०) यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू अण्णा फुलमाळी आणि त्यांची पत्नी सिंधू यांना तीन मुले आणि दोन मुली आहेत. बाळू हे नंदीबैल घेऊन गावोगावी फिरतात. संतवाडी भागात ते नंदीबैल घेऊन गेले होते. दिवाळीनिमित्त ते घरी आले होते. रात्रीचे जेवण केल्यानंतर  बाहेरून आणलेली शीतपेये  मुलांनी प्यायली. त्यानंतर फुलमाळी यांना दिवाळी भेट म्हणून गावोगावी मिळालेली मिठाई मुलांनी खाल्ली. मंगळवारी (१ नोव्हेंबर) सकाळी सहाच्या सुमारास फुलमाळी यांची मुले अनिल, साईराज, धनराज, गौरी आणि पूजा यांना उलटय़ा झाल्या. बाळू यांनी तातडीने मुलांना ओतूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, अनिल आणि साईराज यांचा मृत्यू झाला, तर पुण्यातील ससून रुग्णालयात नेत असताना धनराजचा मृत्यू झाला.

मुलांनी खाल्लेली मिठाई, अन्नपदार्थ तसेच रक्ताचे नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे तपास अधिकारी सहायक निरीक्षक रवींद्र थोरात यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.