आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी  महाराष्ट्र पोलिसांकडून ‘११२’ हेल्पलाइन क्रमांक लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) प्रणालीवर आधारित ही सेवा असेल. नवा क्रमांक सुरू झाल्यानंतर यापूर्वीचा ‘१००’ हा क्रमांक बंद करण्यात येणार आहे.

नव्या क्रमांकामुळे एखाद्या नागरिकाने मदतीसाठी दूरध्वनी केल्यानंतर त्वरित मदत उपलब्ध होईल तसेच पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी (रिस्पॉन्स टाइम) आणखी कमी होईल. यापूर्वी नागरिक तक्रार करण्यासाठी  पोलिसांच्या ‘१००’ क्रमांकावर संपर्क साधायचे. आता नागरिकांना  ‘११२’ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन सेवांसाठी ‘११२’ हाच  हेल्पलाइन क्रमांक  असेल.

एखाद्या नागरिकाने ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तो दूरध्वनी मुंबई किंवा नागपूर येथील कॉल सेंटरमध्ये जाईल. तेथील प्रतिनिधी तक्रारदाराबरोबर संवाद साधतील. ही बहुभाषिक सेवा असल्यामुळे तक्रारदाराला भाषिक अडचण येणार नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली.

यंत्रणा कशी?

मदत किंवा तक्रार करण्याकरिता आता नागरिकांसाठी ‘११२’  हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. मदत मागितल्यास दूरध्वनी कॉल सेंटरला पोहोचेल. त्यानंतर घटनास्थळानजीक गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या जीपीएस यंत्रणेवर त्याची माहिती जाईल. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला कमीत कमी वेळेत मदत मिळेल.

अडचणी काय ? सामान्यांना त्वरित मदत देण्यासाठी गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीवर (बीमटॉप) यंत्रणा आवश्यक आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधीला राज्यातील प्रत्येक ठिकाणाची माहिती असणे गरजेचे आहे. ही माहिती नसेल तर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

खोटय़ा तक्रारींना आळा..

* बऱ्याचदा  पोलिसांच्या ‘१००’ क्रमांकावर खोटी माहिती देणारे, फसवणूक करणारे दूरध्वनी येतात. दूरध्वनीद्वारे आलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांचा वेळ जातो.

* नवीन यंत्रणेद्वारे ‘११२’ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधणारी व्यक्ती कोठून बोलत आहे (लोकेशन), याबाबतची माहिती त्वरित उपलब्ध होईल. पोलिसांना प्रत्यक्ष घटनास्थळाची माहिती काही मिनिटांत उपलब्ध होईल.

‘११२’ हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार असून त्याअनुषंगाने पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्वरित मदत तसेच तक्रारीचे निवारण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.

– डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) पुणे पोलीस