उमेदवारांची मागणी

पोलीसभरती प्रक्रियेत केलेल्या बदलांना उमेदवारांनी विरोध केला आहे. महापरीक्षा संकेतस्थळातून पोलीस भरती वेगळी करावी, पूर्वीप्रमाणे लेखी स्वरूपात परीक्षा घ्यावी, अशा मागण्या उमेदवारांनी केल्या आहेत. या मागण्यांवर कार्यवाही न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या पूर्वी भरतीसाठी लेखी परीक्षा होत होती. मात्र त्यात बदल करून महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. त्याला प्रशांत निकम, गणेश खंदारे, कैलास भिसे आदी उमेदवारांनी विरोध केला आहे. आधीच्या प्रक्रियेनुसार शारीरिक क्षमता चाचणी आधी घेऊन मग लेखी परीक्षा होत होती. आता प्रथम ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. पोलीस भरतीसाठी उमेदवार हा शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. तसेच पोलीस भरती ३ हजार ४०० पदांसाठी होत आहे. त्या पदांच्या संख्येत वाढ व्हावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

राज्य शासनाने या मागण्या मान्य न केल्यास अर्धनग्न मोर्चा प्रत्येक जिल्ह्यत काढून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असे उमेदवारांनी सांगितले.