पोलिसांकडून सक्तीने दुपारीच दुकाने बंदची कारवाई

पुणे : जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत उघडी ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने आणि महापालिकेने देऊनही शहरातील सर्व दुकाने पोलिसांनी सोमवारी दुपारी बारा वाजता सक्तीने बंद केली.  त्यामुळे नागरिकांना दिलासा देणारा आदेश असूनही नागरिकांचे हाल सुरूच असल्याचे पाहायला मिळाले.

महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांवर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारपासून प्रतिबंधित क्षेत्रातील वगळता शहरातील किराणा माल दुकाने तसेच अन्य दुकाने सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत खुली राहणे आवश्यक होते.

प्रत्यक्षात सकाळी उघडलेली दुकाने पोलिसांनी दुपारी १२ वाजताच बंद करायला लावली. पोलिसांचा आदेश जारी झाल्यानंतर शहरातील दुकानदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. कारवाईची भीती आणि संभ्रमामुळे अनेक व्यावसायिकांनी दुकाने उघडली नाहीत.

शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तू आणि सेवेची दुकाने दुपारी १० ते दुपारी २ यावेळेत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली असली तरी कारवाईच्या भीतीमुळे तेथील दुकानेही उघडली नाहीत. प्रतिबंधित भाग वगळून शहरातील अन्य भागात असलेली जीवनावश्यक वस्तू आणि किराणा माल विक्रीची दुकाने दुपारी बारालाच पोलिसांनी बंद करण्याचे आदेश दिले.

आदेश असूनही दुकाने बंदची कारवाई

सहपोलीस आयुक्तांनी दुकाने खुली ठेवण्याची मुभा दिल्यानंतर शहरातील ज्या भागात निर्बंध नाहीत अशा भागातील दुकाने दुपारी १२ वाजताच बंद करण्यात आली. पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाराच्या ठोक्याला दुकाने बंद करण्यास सांगितले. कागदावर दिलेले आदेश आणि प्रत्यक्षातील कारवाई यामुळे अनेक दुकानदारांनी दुकाने उघडलीच नाहीत. त्यामुळे शिथिलता देणारा आदेश असूनही नागरिकांचे हाल सुरूच असल्याचे पाहायला मिळाले. भवानी पेठेतील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. मात्र, कारवाईच्या भीतीमुळे त्यांनी बारा वाजता दुकाने बंद केली. किरकोळ, घाऊक किराणा माल दुकानदार संभ्रमित आहे.

प्रतिबंधित भागातील दुकाने सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. अन्य भागातील दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतरही दुकाने बंद करण्यात आली असतील तर याबाबत मी स्वत: माहिती घेऊन पुढील कार्यवाही करतो.

– डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त