शहरातील दुचाकी न वापरणाऱ्या वाहन चालकांची माहिती संकलित करण्याचा सूचना पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांना दिल्या. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांची माहिती गोळा झाल्यानंतर त्यांच्या घरी हेल्मेट वापरावे म्हणून जनजागृतीची पत्रे पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी सांगितले.
रोटरी क्लब आणि वाहतूक पोलिसाच्या वतीने रोटरीच्या सदस्यांना मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी माथुर बोलत होते. या प्रसंगी रोटरीचे डॉ. दीपक शिकारपूर, विवेक अराहना, पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे उपस्थित होते. या कार्यक्रमात पाचशे हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. मात्र, आतापर्यंत हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न झाले. त्याबरोबर हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात आली. तरीही बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत. त्यामुळेच पोलीस आयुक्तांनी हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांची माहिती संकलित करण्याचे पोलिसांना सांगितले आहे. तयार झालेल्या माहितीवरून त्या वाहन चालकांच्या पालकांना पत्र, ईमेलद्वारे जनजागृती केली जाईल. त्याचबरोबर हेल्मेट वापराच्या जनजागृतीसाठी विमा कंपन्यांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे.
शहरात दुचाकी वितरकांना हेल्मेट वापराबाबत सूचित करण्यात येणार आहे. दुचाकी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना दुचाकीसह हेल्मेटसुद्धा त्या ठिकाणाहून पुरविण्यात यावे, अशी सूचना पोलिसांकडून दुचाकी वितरकांना केली जाणार असल्याचे माथुर यांनी सांगितले.
हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी कार्ड्स तयार करण्यात आली आहेत. आगामी काळात एक लाख कार्ड्स शहरातील नागरिकांना वाटण्यात येणार आहेत. नागरिकांनी हेल्मेटबाबत त्यावर आपल्या प्रतिक्रिया लिहून वाहतूक शाखेला पाठवायच्या आहेत, असे पांढरे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2014 रोजी प्रकाशित
हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांची माहिती संकलित करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या सूचना
हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांची माहिती गोळा झाल्यानंतर त्यांच्या घरी हेल्मेट वापरावे म्हणून जनजागृतीची पत्रे पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी सांगितले.
First published on: 01-07-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police helmet two wheeler binding