पुणे : अपघातानंतर मदतीसाठी पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर (११२) संपर्क साधणाऱ्या एका खासगी कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची सायबर चोरांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सायबर चोरांनी पोलीस हेल्पलाईनच्या क्रमांकात तांत्रिक फेरफार करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सायबर चोरांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका खासगी कंपनीत विभागीय व्यवस्थापकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यवस्थापक हडपसर भागातील मांजरी परिसरात राहायला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बंगळुरू येथील एका नामांकित औषधनिर्माण कंपनीत विभागीय व्यवस्थापक आहेत. २४ जुलै रोजी ते मोटारीतून लातूरकडे निघाले होते. सावळेश्वर टोलनाका येथे ट्रकने मोटारीला धडक दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून, या घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटांत त्यांच्या मोबाइल क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. ‘वाहतूक नियमभंगाचा दंड थकित आहे. ही रक्कम भरल्यानंतर त्वरित पोलीस मदत मिळेल’, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडे केली.

चोरट्यांनी त्यांना संदेशातील लिंक उघडण्यास सांगितले होते. ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यात वेतन जमा झाले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यातून विविध खात्यांमध्ये ९९ हजार ९९९ रुपये ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित झाल्याचे लक्षात आले. त्यांनी बँक व्यवहार तपासले. त्यांच्या खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी अनाेळखी क्रमांकावरून संपर्क साधणारी व्यक्ती, तसेच बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.