बाळासाहेब जवळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढली, हे उघडपणे दिसून येते. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारते आहे. शहरातील राजकीय मंडळींनी गुन्हेगारी पोसली आहे,

हे आता लपून राहिलेले नाही. खऱ्या अर्थाने गुन्हेगारीचा बीमोड करायचा असल्यास लोकप्रतिनिधी व पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. पोलिसांच्या कामात हस्तक्षेप न करता त्यांना पाठबळ देण्याची भूमिका राजकारण्यांनी ठेवली पाहिजे.

हिंजवडीलगत कासारसाई येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना घडली. पुढे, त्यातील एका मुलीचे निधन झाले. याच हिंजवडीत संगणक अभियंता असलेल्या तरुणीचा विनयभंग झाला. तक्रार करण्यासाठी गेली असता तिलाच पोलीस ठाण्यात बसवून दमदाटी करण्यात आली. त्यापाठोपाठ, बेपत्ता झालेल्या सात वर्षांच्या मुलीचा पिंपरीत मृतदेह आढळून आला. शहरात कायदा आणि सुव्यवस्था हा सातत्याने चिंतेचा विषय आहे. तोडफोडीच्या बंद झालेल्या घटना पुन्हा सुरू झाल्याने ही चिंता वाढली असतानाच महिला अत्याचाराच्या एकापाठोपाठ घडलेल्या घटनांचे पडसाद शहरभर उमटले. पिंपरी महापालिकेची सर्वसाधारण सभाही त्यास अपवाद राहिली नाही. या सभेत पोलिसांवर प्रचंड आगपाखड करण्यात आली. शहरात चाललंय तरी काय, पोलीस यंत्रणा काय करते,  स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होऊनही गुन्हेगारी कारावायांमध्ये फरक पडला नसल्याचे निदर्शनास आणून देत हप्तेखोरीमुळे पोलिसांची विश्वासार्हता संपल्याचा आरोप सभेत करण्यात आला. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नाही. महापालिकेच्या मिळकतींमध्ये गुन्हेगारांचे अड्डे तयार झाले आहेत. विरोधकांचे आंदोलन असल्यास मोठा पोलीस फौजफाटा आणण्यात येतो. तेवढी तत्परता शहरभरात दाखवल्यास गुन्हेगारी नियंत्रणात आली असती, असे संमिश्र मुद्दे उपस्थित करण्यात आले. पोलिसांना पाठबळ दिले पाहिजे, असाही सूर व्यक्त झाला. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यावी आणि या संदर्भात सविस्तर चर्चा घ्यावी, अशी सूचना अनेकांनी केली. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन महापौर राहुल जाधव यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून बैठकीसाठी वेळ देण्याची विनंती केली. आर. के. पद्मनाभन यांनी पोलीस आयुक्तांची सूत्रे हाती घेतल्यापासून परिस्थितीमध्ये हळूहळू का होईना सुधारणा होत आहेत. अतिक्रमणे काढणे आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सध्या पोलिसांची शक्ती खर्ची होत आहे. वास्तविक ती कामे महापालिकेची आहेत. पण, महापालिका यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळेच पोलिसांना पुढाकार घ्यावा लागला आहे. शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आली पाहिजे आणि त्यासाठी पोलीस व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.  राजकारण्यांनी गुन्हेगारांना पोसण्याचे उद्योग बंद करावेत. पोलिसांवर नुसतीच टीका करण्यापेक्षा चांगल्या कामासाठी त्यांना पाठबळही दिले पाहिजे. तसे झाल्यास शहराच्या दृष्टीने ते स्वागतार्ह पाऊल असेल.

balasaheb.javalkar@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police need to support peoples representatives
First published on: 03-10-2018 at 02:44 IST