पुणे : राजकीय दबावामुळे गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा निषेध करुन पुणेकरांच्या गटाने सोमवारी पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन निषेध नोंदविला.

हेही वाचा : मराठा आरक्षणाबाबतच्या सुनावण्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच; राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत निर्णय

विसर्जन मिरवणुकीतील गैरव्यवस्थापन आणि उपद्रवाबाबत पोलिसांना नोटीस देण्यात आली आहे. सात दिवसांत उत्तर न दिल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही पुणेकरांच्या गटाकडून देण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे यांना या गटातर्फे निवेदन आणि गुलाबाचे फूल देण्यात आले. डॉ. विश्वंभर चौधरी, मुकुंद किर्दत, निखिल जोशी, उत्पल व्ही. बी., ॲड. अजित देशपांडे, ॲड. अक्षय देसाई, ॲड. तृणाल टोणपे आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : पुणे : गुरुवारी संपूर्ण दिवस काही भागाचा पाणीपुरवठा बंद

विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. मानाच्या गणपती मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी घेतलेला वेळ, ढोल ताशा पथकांतील वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याकडे दुर्लक्ष, मिरवणुकीतील कायदा-सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश, ध्वनिवर्धकांचा वापर, प्रखर प्रकाशझोत अशा मुद्यांकडे लक्ष वेधणारी नोटीस पोलिसांना देण्यात आली आहे. या नोटीशीला उत्तर न दिल्यास कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा पुणेकर नागरिकांच्या गटाकडून देण्यात आला आहे.