आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे पुणे संधान एका तरुणीच्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. दहावीत नव्वद टक्के गुण मिळवून अकरावीला विज्ञान शाखेत शिकणारी पुण्यातील एक सोळा वर्षांची मुस्लीम समाजातील तरुणी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून या दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात ओढली गेली. २०१७ मध्ये ती या संघटनेत प्रत्यक्षात सहभागीही होणार होती. मात्र, वेळीच हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्याने तिचे कुटुंबीय व धर्मगुरूंच्या मदतीने पोलीस तिला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करीत असून, त्यासाठी तिचे समुपदेशन करण्यात येत आहे.
दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विवेक फणसाळकर व पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांना मिळालेल्या माहितीनुसार इसिसच्या सोशल नेटवर्कमध्ये पुण्यातील तरुणी आल्याचे समजले होते. त्यानुसार गुप्तचर व तांत्रिक पद्धतीने या प्रकरणाची तपासणी करण्यात आली. त्यातून संबंधित तरुणीला हेरण्यात आले. मागील चार महिन्यापासून या तरुणीचा स्वभाव पूर्णपणे बदलला होता. साधे कपडे किंवा जिन्स पॅन्ट घालणाऱ्या या तरुणीने नेहमी बुरखा घालण्यास सुरुवात केली होती.
पोलिसांच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या वृत्तांमधून तिला आयसिसबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे सोशल नेटवर्कच्या माध्यमातून तिने या संघटनेचा शोध घेतला. त्यातून आयसिसचे ऑनलाईन काम करणाऱ्या काहींशी तिचा संपर्क झाला. त्यानंतर त्यांच्यात फेसबुक, वॉट्स अॅप आदींच्या माध्यमातून संभाषण सुरू झाले. फेसबुकवर तिचे दोनशे मित्र आहेत. इसिसच्या संपर्काबद्दल राजस्थानमधील महोम्मद सिराजुद्दीन या तरुणाला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. हा तरुणही पुण्यातील या तरुणीच्या फेसबुक मित्रांच्या यादीत आहे.
आयसिसमध्ये २०१७ मध्ये सहभागी होण्यासाठी तिने सीरिया येथे जाण्याचीही तयारी सुरू केली होती. तिथे तिला वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश व सर्व खर्च करण्याचे आमिषही दाखविण्यात आले होते. पण, त्यासाठी भारतात काहीही करायला तयार राहिले पाहिजे, असे तिला कळविण्यात आले होते. पोलिसांनी चौकशी बोलविल्यास कशा पद्धतीने उत्तरे द्यायची व ग्रुपमध्ये कोणत्याही सदस्याशी फोनवर थेट न बोलता सोशल नेटवर्कीगच्या माध्यमातूनच संपर्क साधण्याच्या सूचनाही तिला देण्यात आल्या होत्या.
पोलिसांना या सर्व गोष्टी तपासातून कळाल्यानंतर त्यांनी तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व कुटुंबीयांना याची माहिती दिली. या माहितीमुळे कुटुंबाला धक्काच बसला. पोलिसांनी सध्यातरी तिच्यावर गुन्हा दाखल न करता तिला यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. अधिकारी व धर्मगुरू तिचे समुपदेशन करीत आहेत.
मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन
आयसिसच्या संपर्कात आलेल्या तरुणीबाबत बोलताना दहशतवादी विरोधी पथकाचे सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, इसिसकडून अल्पवयीन मुले व मुलांना भडकविण्यात येत आहे. त्यातूनच ही तरुणी इसिसच्या संपर्कात आली होती. त्यामुळे पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या राहणीमानातील बदल, सोशल नेटवर्किंग साईट्सवरील त्यांचे अकाऊंट, महाविद्यालयातील व बाहेरचे मित्र याची माहिती पालकांनी ठेवली पाहिजे. काही संशयास्पद वाटल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2015 रोजी प्रकाशित
आयसिससोबत जाण्याची तयारी केलेल्या पुण्यातील तरुणीचे पोलिसांकडून समुपदेशन
आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे पुणे संधान एका तरुणीच्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 18-12-2015 at 00:06 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police successful to stop the girl join isis group