ठाणे जिल्ह्य़ातील आश्रमशाळांमधील मुलींवरील अत्याचार प्रकरणाचा यशस्वी तपास करणाऱ्या आणि भिवंडीत वाहतूक शिस्तीचा अनोखा ‘पॅटर्न’ राबवणाऱ्या पोलीस अधीक्षक डॉ. रश्मी करंदीकर यांचे मार्गदर्शन पुण्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ‘लोकसत्ता’ आणि ‘युनिक अॅकॅडमी’ याच्यातर्फे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘झेप’ या मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. करंदीकर यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.
डॉ. रश्मी करंदीकर या सध्या मुंबई येथे महामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. २००४ मध्ये झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या अ-प्रवर्ग परीक्षेत त्यांनी मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. ठाण्यातील शहापूर, कळंबोली आणि नेरूर येथील आश्रमशाळांमध्ये झालेल्या मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणात करंदीकर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार तपास केला होता. त्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर आरोपींना शिक्षा झाली होती. भिवंडी येथील वाहतूक शाखेत असताना तेथील विद्यार्थ्यांच्या साहाय्याने करंदीकर यांनी राबवलेला वाहतूक शिस्तीचा ‘भिवंडी पॅटर्न’ विशेष गाजला.
शुक्रवारी (१७ जानेवारी) सकाळी साडेदहा ते दुपारी १ या वेळात टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या ‘अ’ प्रवर्ग परीक्षेच्या गुणवत्ता यादीत ९ वा क्रमांक मिळवलेले व सध्या उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त झालेले डॉ. सचिन घागरे हेदेखील या वेळी आपले अनुभव सांगतील. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे (यशदा) महासंचालक डॉ. संजय चहांदे काही अपरिहार्य कारणांमुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाहीत.