लांबलचक भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवार यांच्या पुण्यातील भाषणाने चाकण विमानतळावरच ‘घिरटय़ा’ घातल्या! बुधवारी पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या आघाडीच्या सभेत दादांनी पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ हवे, या मुद्दय़ावर भलताच जोर दिला. मेट्रोपासून मैलापाणी प्रक्रियेपर्यंतची कामे तर आहेतच, पण पुणे आणि पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले नाही तर भावी पिढी तुम्हा-आम्हाला माफ करणार नाही, असाच दादांच्या भाषणाचा सूर होता.
अजित पवार म्हणाले, ‘‘आताचे पुण्याचे विमानतळ संरक्षण खात्याचे विमानतळ आहे. त्यामुळे रात्री १० वाजल्यानंतरची रात्रीची उड्डाणे या विमानतळावरून करता येत नाहीत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे आंतरराष्ट्रीय विमानतळ जेव्हा होईल तेव्हा जगाच्या नकाशावर ही शहरे जातील. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची आवश्यकता आहे. नवी मुंबईमधील पनवेल परिसरात जसे विमानतळाचे काम मंजूर झाले आहे, त्याच पद्धतीचे विमानतळ पुण्यात करावे लागेल.’’
‘दोन वेळा खेड आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेला एक उमेदवार दिल्ली आणि मुंबईत विमानतळाला आपला विरोध नसल्याचे सांगतो आणि खेडमध्ये आल्यानंतर मात्र विमानतळाला विरोध करतो,’ अशी टीकाही दादांनी केली. ते म्हणाले, ‘‘धरणे, उड्डाण पूल, रेल्वे, मेट्रो, रस्ता रुंदीकरण, रिंगरोड या कामांमध्ये कुणाच्या ना कुणाच्या जमिनी जात असतात. शेतकऱ्याच्या जमिनी जाव्यात आणि तो उद्ध्वस्त व्हावा ही भूमिका आघाडी सरकारची नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन घेताना शेतकऱ्याला त्रास होऊ देणार नाही. मात्र ते विमानतळ पुढच्या पिढीला वरदान ठरेल. भविष्यात उद्योगधंदे मोठय़ा प्रमाणावर यावेत, शेतकऱ्याने पिकवलेला भाजीपाला, फळे, फुले जागतिक बाजारपेठेत पाठवण्यासाठी विमानतळाची गरज आहे.’’
‘हे काही तुमच्या-माझ्या घरचे लग्न नाही!’
‘मला यांनी विचारलेच नाही, माझे पत्रिकेत नावच नाही, मला स्टेजवर बसवले नाही, असे विचार करू नका, हे काही तुमच्या किंवा माझ्या घरचे लग्न नाही!,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मतभेद आटोपते घेण्याचा उपदेश केला. ते म्हणाले, ‘‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काही मदभेद झाले असतील. महानगरपालिका, नगरपालिका, पंचायतीमध्येही दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले असतील. परंतु तो प्रश्न वैयक्तिक आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी घरे बांधणी, झोपडपट्टी निर्मूलन, मध्यम वर्गीयांना परवडतील अशी घरे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी या प्रश्नांच्या बाबतीत एकोपा असण्याची गरज आहे. मागे काय झाले ते उकरत बसण्यापेक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांना दिल्लीत कशी ताकद देता येईल याचा विचार करा. घर मजबूत असेल तरच महाराष्ट्रात मजबुतीने काम करता येईल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political ncp election canvassing ajit pawar
First published on: 27-03-2014 at 03:25 IST