पाण्याची समस्या नसल्याचा पालिकेचा दावा; मात्र सर्वाधिक तक्रारी पाण्याच्या, पाणीकपातीला वाढता विरोध

पिंपरी : वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सर्वाधिक तक्रारी पाण्याविषयक आहेत. जवळपास वर्षभरापासून पाणीकपातीविरोधात राजकीय पक्षांची आंदोलने सुरू आहेत. पालिका निवडणुका तोंडावर असल्याने अपुरा, दूषित आणि विस्कळीत पाणीपुरवठा हाच कळीचा मुद्दा ठरतो आहे. अशा परिस्थितीत, महापालिकेने मात्र पाण्याची फारशी काही समस्या नसल्याचे दाखवत पाणीकपातीचे समर्थन केले असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करू, अशी ग्वाहीदेखील दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दूषित पाणी, वेळी-अवेळी दिले जाणारे पाणी, अपुरा व विस्कळीत पाणीपुरवठा यावरून बाराही महिने तक्रारी होत आहेत. सध्या सुरू असलेल्या जनसंवाद सभेत आठही क्षेत्रीय कार्यालयांमधून पाण्याच्या तक्रारी जास्त दाखल होत आहेत. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे अडीच वर्षांपूर्वी तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीकपात लागू केली, तेव्हापासून शहरवासीयांना दररोजऐवजी दिवसाआड पाणी देण्यात येते. काही दिवसांच्या प्रयोगानंतर पुन्हा दररोज पाणीपुरवठा सुरू करू, असे त्यांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पाळले नाही. अजूनही पाणीकपात सुरूच आहे. त्यावरून नागरिकांच्या तक्रारी तर होतच आहेत. संस्था, संघटना, राजकीय पक्षांची आंदोलनेही होत आहेत. सुरुवातीपासूनच पाणीकपातीवर ठाम असलेल्या महापालिने तीच भूमिका कायम ठेवली आहे.

पाणीकपात रद्द करण्यासह पाणीविषयक इतर मागण्यांसाठी पिंपरी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने काही दिवसांपूर्वी मुख्यालयामसोर आंदोलन करण्यात आले, तेव्हा पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तोपर्यंत आंदोलकांची दखल न घेणारे आयुक्त राजेश पाटील मंत्री येताच तेथे तातडीने पोहोचले. दीड महिन्यात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रत्यक्षात पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या लेखी पत्रातील भाषा वेगळीच जाणवते.

पालिकेचे म्हणणे काय?

ऑक्टोबर २०१९ पासून शहरात पाणीकपात लागू आहे. त्यानुसार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. भामा आसखेड व आंद्रा धरणातून पाणीउपसा करून पाणीपुरवठा करणारी योजना पालिकेने हाती घेतली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पाणीक्षमतेत वाढ होणार आहे. जेथे अपुऱ्या पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी आहेत. त्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिवसाआड एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळेच पाणीपुरवठय़ाच्या तक्रारींचे प्रमाण कमी आहे. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्यामागे तांत्रिक अडचणींचे कारण आहे. काही भागात गढूळ व दूषित पाण्याच्या तक्रारी येतात, त्यांचे निराकरण केले जाते. अनधिकृत नळजोड, पाण्याची गळती तसेच जलवाहिन्यांवरून थेट पाणी खेचणाऱ्या मोटारी लावण्यात येतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या पाणी समस्येच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येत आहे, असे लेखी पत्र पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

नियोजनशून्य कारभार

नियोजनशून्य कारभारावरून स्थायी समिती, पालिका सभेत पाणीपुरवठा विभागावर सातत्याने हल्लाबोल करण्यात आल्याचे दिसून येते. या विभागासाठी अनेक अधिकाऱ्यांनी काम केले. तथापि, कोणालाही पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश आले नाही. अशाच एका अपयशी अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर लगेचच या विभागाचा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.