पुणे : ग्रामोफोन तबकडय़ांचे संग्राहक प्रभाकर दातार (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. त्यांच्या संग्रहात दहा हजारांहून अधिक ग्रामोफोन तबकडय़ा होत्या.
शास्त्रीय संगीताचे जाणकार असलेले दातार रिझव्र्ह बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाले होते. सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स या संस्थेच्या संस्थापकांपैकी ते एक होते. वेगवेगळे विषय निवडून त्यावर निवेदनाच्या माध्यमातून माहिती देत ध्वनिमुद्रिका ऐकविणे असे अनेक कार्यक्रम दातार यांनी सादर केले. ‘शाकुंतल ते कुलवधू’, ‘बालगंधर्व- एक स्मरण’, ‘संगीतसूर्य केशवराव भोसले यांची गायकी’, ‘मा. दीनानाथ यांचे पुण्यस्मरण’, ‘भक्तिसंगीत’, ‘जुने चित्रपट संगीत’, ‘रामकली ते भैरवी- एक प्रवास’, ‘मल्हारचे प्रकार’, ‘मूळ चीजा आणि त्यावर आधारित पदे’, ‘गाणी मनातली-गळय़ातली’, ‘चित्रपटातील रागदारी संगीत’ असे ध्वनिमुद्रिका श्रवणाचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम दातार यांनी सादर केले. ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया’ हे गीत श्रीधर पार्सेकर यांनी व्हायोलिनवर वाजविले होते. हे दुर्मीळ ध्वनिमुद्रण दातार यांच्या संग्रही होते. गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर, पं. गोविंदराव अग्नी, पं. सुरेश हळदणकर, केसरबाई बांदोडकर यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका दातार यांच्याकडे होत्या. ज्येष्ठ गायक पं. राम मराठे, स्वरराज छोटा गंधर्व यांच्यासह अनेक कलाकार दुर्मीळ ध्वनिमुद्रण ऐकण्यासाठी दातार यांच्या मुंबईतील कुर्ला येथे असलेल्या निवासस्थानी जात असत.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2022 रोजी प्रकाशित
ग्रामोफोन तबकडय़ांचे संग्राहक प्रभाकर दातार यांचे निधन
ग्रामोफोन तबकडय़ांचे संग्राहक प्रभाकर दातार (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले/
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-05-2022 at 00:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhakar datar collector gramophone trays dies reserve bank india society indian record amy