कुर्ल्याचे ग्रामोफोन तबकड्यांचे संग्राहक प्रभाकर दातार यांचे (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने आज (शनिवार) पिंपरी येथे निधन झाले. त्यांच्या संग्रहात दहा हजारांहून अधिक ग्रामोफोन तबकड्या होत्या.

शास्त्रीय संगीताचे जाणकार असलेले दातार सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स या संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते. वेगवेगळे विषय निवडून त्यावर निवेदनाच्या माध्यमातून माहिती देत ध्वनिमुद्रिका ऐकविणे असे अनेक कार्यक्रम दातार यांनी सादर केले. ‘शाकुंतल ते कुलवधू’, ‘ बालगंधर्व-एक स्मरण’, ‘संगीतसूर्य केशवराव भोसले यांची गायकी’, ‘मा. दीनानाथ यांचे पुण्यस्मरण’, ‘भक्तिसंगीत’, ‘जुने चित्रपट संगीत’, ‘रामकली ते भैरवी-एक प्रवास’, ‘मल्हारचे प्रकार’, ‘मूळ चीजा आणि त्यावर आधारित पदे’, ‘गाणी मनातली-गळ्यातली’, ‘चित्रपटातील रागदारी संगीत’ असे ध्वनिमुद्रिका श्रवणाचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम दातार यांनी सादर केले.

‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील ‘यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया’ हे गीत श्रीधर पार्सेकर यांनी व्हायोलिनवर वाजविले होते. हे दुर्मीळ ध्वनिमुद्रण दातार यांच्या संग्रही होते. गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर, गोविंदराव अग्नी, पं. सुरेश हळदणकर, केसरबाई बांदोडकर यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका दातार यांच्याकडे होत्या.