ऐंशी वर्षांत १३०० चित्रपट प्रदर्शित, सलग अडीच वर्षे चाललेला ‘माहेरची साडी’ हा चित्रपट, गेली ३८ वर्षे मराठी चित्रपटांचेच खेळ, बालगंधर्व यांचा अभिनयाचा साक्षीदार, व्ही. शांताराम-फत्तेलाल या दिग्गजांचा संबंध.. अशा अनेक आठवणी प्रभात चित्रपटगृहाने गेल्या ८० वर्षांच्या काळात जोपासल्या आहेत. ते राहणार की जाणार हे पुढील महिनाभरात स्पष्ट होणार आहे.
‘प्रभात’चा करार जानेवारी महिन्यात संपत आहे. २१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने आता ज्या जागेवर आहे ती जागा भाडेपट्टय़ावर घेतली. तेव्हापासून आतापर्यंतच्या ८० वर्षांच्या काळात या चित्रपटगृहाने अनेक आठवणी जपल्या आहेत. ते किबे लक्ष्मी थिएटर या नावानेही ओळखले जाते. ‘प्रभात’ मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेतील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पहिला सिनेमा होता इंग्रजी, म्युझिकल कॉमेडी या प्रकारातील. नाव होते- ‘लव्ह मी टू नाइट.’ पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला- अमृतमंथन. ८० वर्षांच्या काळात तिन्ही भाषेतील एकूण १३०० चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. शेवटचा दीर्घ काळ चाललेला हिंदी चित्रपटच होता- जितेंद्र-जयाप्रदा यांचा ‘तोहफा’. गेल्या ३८ वर्षांत मात्र नाममात्र अपवाद वगळता सर्व मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या ठिकाणी सर्वाधिक काळ चाललेला चित्रपट आहे- माहेरची साडी. तो सलग तब्बल १२८ आठवडे चालला. याशिवाय सुवर्ण महोत्सवी (५० आठवडे) आणि रौप्यमहोत्सवी (२५ आठवडे) अनेक चित्रपट चालले.
प्रभात हे चित्रपटगृह आणि नाटय़गृह म्हणूनही वापरले जायचे. तेथे बालगंधर्व यांचेही प्रयोग झाले आहेत.
भागीदार: मूळचे व आताचे
प्रभात फिल्म कंपनीचे मूळचे चार भागीदार होते- व्ही. शांताराम, फत्तेलाल, व्ही. जी. दामले आणि बाबुराव पै. पुढे व्ही. शांताराम आणि फत्तेलाल कंपनीतून बाहेर पडल्याने दामले, पै हे भागीदार उरले आहेत. प्रभातचा भाडेपट्टा कराराची मुदत अनेकदा वाढवण्यात आली. जागामालक आहेत – सरदार किबे. अलीकडचा करार २९ वर्षांपूर्वी झाला होता. तो येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात संपत आहे.
रेडीरेकनरनुसार जागेची किंमत
प्रभात चित्रपटगृहाचे क्षेत्र १४ हजार चौरस फूट इतके आहे. त्या भागात सध्या व्यावसायिक जागेचा दर प्रति चौरस फुटाला २०,४०० रुपये इतका आहे. त्यामुळे रेडीरेकनरनुसार या जागेची किंमत तब्बल २८ कोटी ५६ लाख रुपये इतकी होते.
‘‘या चित्रपटगृहाशी आम्ही भावनिकदृष्टय़ा जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे ते आम्हाला टिकवायचे आहे. भाडेपट्टा करार संपल्यावर ही जागा योग्य मोबदला देऊन आम्ही घेऊ इच्छितो. तसे आम्ही मालक किबे यांना कळवले आहे. त्यावर काय निर्णय होतो याची आम्ही वाट पाहत आहोत.’’
– विवेक दामले, संचालक, प्रभात चित्रपट गृह