एकत्र येऊन उत्पादन, प्रक्रिया, विपणन आणि वितरण या क्षेत्रामध्ये अभिनव संकल्पना आणल्यास लघुउद्योगांची प्रगती होऊ शकेल. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असे मत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी रविवारी व्यक्त केले.
लघुउद्योग भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातर्फे ‘वैश्विक अनिश्चिततेमध्ये लघु आणि मध्यम उद्योगांचे स्थान’ या विषयावरील व्याख्यानसत्रात जावडेकर बोलत होते. व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. गिरीश जखोटिया, लघुउद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. पी. एस. कृष्णा, सरचिटणीस ओमप्रकाश मित्तल, लघुउद्योग भारतीचे प्रांत उपाध्यक्ष रवींद्र सोनावणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संस्थापक बाळासाहेब गव्हाणे या वेळी उपस्थित होते.
देशामध्ये लवकरच भाजप सरकार येईल असा विश्वास व्यक्त करून जावडेकर म्हणाले, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राहणार असून रोजगार वाढविणारे नवे प्रारूप आणण्यात येईल. उद्योगांना पतपुरवठा करण्याचे नवे सुटसुटीत धोरण आखण्यात येणार असून एक खिडकी योजना आणून इन्स्पेक्टर राज संपुष्टात येईल.
जखोटिया म्हणाले, शेती आणि त्यावर आधारित उद्योगांनी एकत्र येऊन वेळ, पैसा आणि बुद्धी खर्च केली, तर कोणत्याही कामासाठी त्यांना मोठय़ा कंपन्यांवर विसंबून राहण्याची गरज पडणार नाही. लघु आणि मध्यम उद्योगांनी व्यवसायाशी निगडित सर्व गोष्टींची म्हणजेच ग्राहक ते गुंतवणूकदार यांची एकत्रित माहिती तयार करण्याची गरज आहे. बाजाराचा अभ्यास, माहितीचे आदान-प्रदान, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, ग्राहकांचे शिक्षण, मूल्यवर्धन आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण या बाबींवर भर दिला पाहिजे.