प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांच्या राजीनाम्याच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या उपस्थितीत रविवारी (१९) कार्यकारिणीची बैठक होणार आहे. सध्या प्रभारी म्हणून काम पाहात असलेले प्रकाश पायगुडे यांच्यावरच प्रमुख कार्यवाहपदाची जबाबदारी सोपविण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी पुण्यामध्ये आले आहे. त्यापूर्वी गोवा येथील महामंडळाच्या बैठकीत महामंडळ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या कालावधीत झालेल्या धुसफुसीचे पर्यावसन प्रा. मिलिंद जोशी यांच्या राजीनाम्यामध्ये झाले. वैयक्तिक कामाची जबाबदारी वाढली असल्याने मसाप आणि साहित्य महामंडळ या दोन्ही संस्थांच्या प्रमुख कार्यवाहपदातून मुक्त होत असल्याचे जोशी यांनी सांगितले. मात्र, मसाप अध्यक्षांच्या बनावट सहीचे बोगस मजकूर असलेले पत्र गोवा येथील बैठकीमध्ये सादर केल्यामुळे जोशी यांचा राजीनामा घेतला असल्याचे सांगत खुद्द डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी या राजीनाम्यासंदर्भात नव्याने प्रकाश टाकला. त्यानंतर प्रकाश पायगुडे यांची प्रभारी प्रमुख कार्यवाहपदी निवड करण्यात आली.
‘मसाप’च्या कार्यकारिणीची बैठक रविवारी (१९ मे) होत असून त्यामध्ये प्रा. मिलिंद जोशी यांचा राजीनामा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. मात्र, जोशी यांच्या राजीनाम्याची माहिती पत्रकारांना देत असताना शेजवलकर यांनी ज्यांचा नामनिर्देश केला त्यांनी मसाप पदाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये खुद्द शेजवलकर यांनीच यासंदर्भातील माहिती कार्यकारिणी सदस्यांना द्यावी यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रा. मिलिंद जोशी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर प्रमुख कार्यवाहपदी सध्या प्रभारी म्हणून काम पाहात असलेल्या प्रकाश पायगुडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेनुसार प्रमुख कार्यवाह हा साहित्य महामंडळाचाही प्रमुख कार्यवाह असतो. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या २५ मे रोजी होणाऱ्या बैठकीत पायगुडे यांची निवड ही केवळ औपचारिकता राहणार आहे.

कार्यवाहपदी महिलेला संधी
प्रकाश पायगुडे यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर एका महिलेला संधी मिळण्याचे संकेत आहेत. या पदासाठी मराठी विषयाच्या दोन प्राध्यापक आणि कवयित्री अशा तीन नावांची चर्चा असून त्यांच्यातूनच कार्यवाहपदाची निवड होणार आहे.