पुणे : करोना प्रादुर्भावाचा फटका देशभरातील शिक्षण क्षेत्रात वेगवेगळय़ा पातळय़ांवर बसला असला, तरी शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाल्यामुळे प्रवेशसंख्या घटण्यावर त्याचा अधिक परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशभरातील पूर्व प्राथमिक, पहिली आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश २०१९-२० च्या तुलनेत कमी झाले. त्यात पूर्व प्राथमिकचे प्रवेश २९.१ लाख, पहिलीचे प्रवेश १८.८ लाख, तर विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश साडेतीन टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अ युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन (यूडायस) प्लस या प्रणालीचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक या स्तरावर एकूण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याची निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. २०२०-२१ मध्ये १२.२ कोटी विद्यार्थिनींनी प्राथमिक ते उच्च माध्यमिकच्या वर्गामध्ये प्रवेश घेतला. २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ११.८ लाखांनी वाढ झाली.
करोना काळात शैक्षणिक प्रवेश पुढे ढकलले गेल्याने त्याचा प्रवेशावर परिणाम झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच पूर्वप्राथमिक आणि पहिलीच्या प्रवेशांमध्ये घट झाल्याचे दिसते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश
करोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी आणि अन्य कारणांमुळे विद्यार्थ्यांनी मोठय़ा प्रमाणात शाळा बदलल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशभरातील ३९.७ लाख विद्यार्थ्यांनी अनुदानित आणि खासगी शाळांकडून शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.