संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. श्री क्षेत्र देहू आणि आळंदी येथे पालखी सोहळ्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रस्ते, पाण्याची व्यवस्था, दिवाबत्ती यांसह पालखी सोहळ्यामध्ये लागणारी सर्व कामे पूर्ण होत आली आहेत.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोमवारी (दि. २४ जून) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीच्या पालखीचे मंगळवारी (दि. २५) प्रस्थान होणार आहे. यासाठी दोन्ही ठिकाणच्या देवस्थान विश्वस्तांकडून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री क्षेत्र देहू संस्थानच्या वतीने पालखी रथ, गरुड टक्के यांना झळाळी देण्याचे काम पूर्ण केले आहे. मंदिराची रंगरंगोटी, साफसफाई, वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणीची साफसफाई करण्यात आली आहे. मंदिरामध्ये ३२ आणि पालखी रथामध्ये ४ सीसीटीव्ही  बसविण्यात आले आहेत. ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने रस्ते, नदीचा घाट स्वच्छ करण्यात आला असून पिण्याचे पाणी, आरोग्याच्या दृष्टीने लागणारी औषधे, दिवाबत्तीची दुरुस्ती करण्यात आली आहे. प्रवासासाठी परिवहन महामंडळ, पीएमपी बसेसच्या जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. देहू नगरीमध्ये पालखी सोहळ्यासाठी भाविक दाखल होत असून ठिकठिकाणी भजन, कीर्तन, पारायण, हरिनाम सप्ताह सुरू असून टाळ, मृदंग आणि हरिनामाच्या गजराने देहूतील वातावरण भक्तिमय झाले आहे.

जिल्हा प्रशासन आणि नगरपरिषदेच्या वतीने  सोहळ्यासाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण केली आहेत.  स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. देवस्थान विश्वस्तांच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कामांची तयारी पूर्ण केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.  मुक्कामाच्या ठिकाणांची कामेही पूर्ण करण्यात येत आहेत.