पुण्यातील जुन्या वाडय़ांची पुनर्रचना करून ते हेरिटेज स्वरूपात जतन करण्याबाबत विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच सांगितले. ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट करण्यात नगररचनाकारांनी योगदान देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
पुण्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. ‘महाराष्ट्रात वेगाने नागरीकरण होत आहे. अशा वेळी नगररचनाकारांनी नगरपालिका व नगरपरिषदांच्या विकासाकडे अधिक लक्ष देऊन ‘वॉक टू वर्क’ संकल्पना राबवायला हवी,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. अधिक एफएसआय देऊन म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करण्याची कार्यवाही चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आशियातील सर्वात मोठे हायटेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र मोशी येथे सुरू होणार असून लवकरच त्याच्या इमारतीच्या बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. चाकण येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
‘नगररचनाकारांची कमतरता जाणवत आहे. यासाठी याबाबतचे शिक्षण देणाऱ्या दर्जेदार संस्था निर्माण होणे आवश्यक आहे,’ असे मत आयटीआय, दिल्ली संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिवाकर मेश्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, पिंपरी-चिंचवड नगरविकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, नगररचना विभागाचे संचालक कमलाकर आकोडे उपस्थित होते. ‘नियोजन विचार’ या विशेषांकाचे प्रकाशही या वेळी करण्यात आले.