राज्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेता दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्या बैठकीत रविवारी घेण्यात आला. १० मे पूर्वी शासनाशी चर्चा करून खरेदी व विक्रीचे दर वाढवून त्याची अंमलबजावणी करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. खरेदीचे दर वाढल्यास म्हशीचे दूध प्रति लिटर सहा रुपयांनी, तर गाईचे दूध प्रतिलिटर चार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
कृती समितीचे अध्यक्ष विनायक पाटील, उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. दुष्काळाची स्थिती लक्षात घेता पाणी व चाऱ्याच्या टंचाईमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे जिकिरीचे झाले आहे. अनेकांनी जनावरे छावण्यांमध्ये ठेवली आहेत. त्याचप्रमाणे पशुखाद्य, वीज, डिझेल, फर्नेस ऑईल आदींच्या दरामध्ये झालेली वाढ लक्षात घेता दुधाच्या खरेदी दरामध्ये वाढ करण्याची मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. त्या पाश्र्वभूमीवर कृती समितीची बैठक घेण्यात आली.
दुष्काळी स्थितीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हशीच्या दूधखरेदीत पाच रुपयांची, तर गाईच्या दुधाच्या खरेदीत तीन रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली. दुष्काळी स्थिती सुधारल्यानंतर दर कमी करण्याबाबत निर्णय घेता येईल, असेही बैठकीत ठरविण्यात आले. राज्यभरात सुमारे एक कोटी लिटर दुधाचे दररोज संकलन होते. त्यातील निम्मे दूध सहकारी संस्थांच्या माध्यमातून, तर इतर दूध खासगी संस्थांच्या माध्यमातून संकलित करण्यात येते. खरेदी व विक्रीच्या दरवाढीबाबत शासनाशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. बैठकीला औरंगाबाद, शिवामृत, कोल्हापूर, वारणा, राजारामबापू, पुणे या सहकारी दूध संघांबरोबरच चितळे, माऊली, पराग, स्वराज, सोनाई, उर्जा, कृष्णाई, गोविंद आदी खासगी संस्थांचे ७० प्रतिनिधी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2013 रोजी प्रकाशित
दुधाच्या खरेदी व विक्रीचे दर वाढणार
दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्या बैठकीत रविवारी घेण्यात आला.
First published on: 06-05-2013 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Price hike in cow buffelo milk after 10th may