राज्यामध्ये सर्वत्र गाईच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी दूध कृती समितीने नुकताच घेतला आहे. त्यानुसार दूध उत्पादक शेतक ऱ्यांना प्रतिलिटर २० रुपये देण्यात येणार असून गाईच्या दूध विक्री दरामध्ये कोणताही वाढ करण्यात आलेली नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दूध पावडरचा तुटवडा असल्याने, त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर घसरला असल्याने भारतातील दूध पावडरला मोठी मागणी आहे. ही मागणी पुरविण्यासाठी दूध पावडर उत्पादक कंपन्या चढय़ा दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे पाऊच पॅकिंग करून विक्री करणाऱ्या प्रकल्पांना पुरेसे दूध उपलब्ध होत नाही. अनिष्ट स्पर्धा सुरू झाली असून दूध खरेदी दरात एकवाक्यता राहिली नाही.  दूध व्यवसायातील अडचणींवर चर्चा करण्यासाठी राज्य सहकारी दूध उत्पादक संघ कृती समितीची बैठक कात्रज येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मुख्य कार्यालयामध्ये झाली. त्यामध्ये खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे टँकरने थंड दुधाचा पुरवठा करणाऱ्यास प्रतिलिटर साडेतीन रुपये वरकड खर्च देण्याचे ठरले. गाय दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून डेअरी ते विक्रेते यामधील खर्चामध्ये दोन रुपये कपात करण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष विनायक पाटील आणि उपाध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी कळविले आहे.