अध्ययन अक्षमता, मतिमंदत्व, बहुविकलांगता व स्वमग्नता यांसारख्या विविध समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारी ‘प्रीझम फाऊंडेशन’ ही संस्था येत्या रविवारी (दि. १) रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. विशेष गरजा असणाऱ्या मुलांबरोबर कार्यरत असणारी ही संस्था शिक्षक न मिळणे, जागेची अडचण, पैशाची चणचण, विविध नैसर्गिक आपत्ती यांना तोंड देत आता रौप्यमहोत्सवी वर्षांच्या उंबरठय़ावर उभी असून, विशेष समस्या असणाऱ्या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य जोमाने करीत आहे.
प्रीझममार्फत फिनिक्स स्कूल, लार्क, माधवी ओगले व्यावसायिक शाळा, बेन्यू प्रशिक्षण संस्था तसेच सृजनरंग आदी उपक्रम चालविले जातात. अध्ययन अक्षमता, मतिमंदत्व, बहुविकलांगता व स्वमग्नता यांसारख्या विविध समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे कार्य या संस्थेत केले जाते. दैनंदिन जीवनात जगण्यासाठीच्या आवश्यक प्रशिक्षणाबरोबरच व्यावसायिक प्रशिक्षण देऊन या मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम केले जाते. रौप्यमहोत्सवानिमित्ताने प्रसिद्ध निवेदक अरुण नूलकर यांचा ‘खुसखुशीत’ हा कार्यक्रम रविवारी सकाळी ९.३० वाजता संस्थेत आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
काही समस्या असणाऱ्या मुलांसाठी काम करायला हवे, या ध्यासातून पद्मजा गोडबोले, वाय. जी. पटवर्धन, माधवी ओगले यांनी या संस्थेची स्थापना केली. त्या वेळी विशेष मुलांच्या समस्यांविषयी विशेष जागरूकता नसतानाही त्यांनी नेटाने ही जागरूकता निर्माण करण्याबरोबरच या मुलांच्या जगण्याला एक नवी दिशा देण्याचे कार्य सुरू केले.
मुलांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पालक, विद्यार्थ्यांमध्ये जशी त्या वेळी जागरूकता नव्हती, तशीच त्यासंदर्भातील शिक्षणपद्धतीदेखील माहिती नव्हती. पुस्तकी ज्ञानाच्या बरोबरीनेच प्रात्यक्षिकांची जोड या मुलांना शिकवण्यासाठी आवश्यक होती. ती शिक्षकांना देऊन या मुलांना घडविण्यासाठी कार्य सुरू झाले. समस्या असणाऱ्या मुलांमध्ये ‘समस्या आहेत’, असे केवळ न म्हणता, त्यांना समाजामध्ये सामावून घेतले जावे या उद्देशाने त्यांच्यातील चांगल्या गुणांची दखल प्रामुख्याने घेतली गेली. ही संस्था सुरू झाली तेव्हा केवळ ४२ मुलेच या शाळेत होती आता प्रीझमच्या तिन्ही शाळांमध्ये साधारणपणे ३०० विद्यार्थी विशेष शिक्षण घेत आहेत.
शाळा-शाळांमध्ये जाऊन जागरूकता निर्माण करीत असताना, मुलांना केवळ मतिमंदत्व या गटात टाकण्याकडे अधिक कल होता. ही मुलांमधील समस्या जाणून घेत असताना शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक यांच्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. त्यातून या मुलांची समस्या नेमकी कोणती आहे, याचा शोध घेतला गेला आणि त्यातून त्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळेल याची काळजी घेण्यात आली. या सगळय़ा समस्या जाणून घेत असताना मुलांच्या समस्यांना अनुषंगून मतिमंदत्व आणि अपंगत्व असणाऱ्या मुलांसाठीच्या संस्थेची स्थापनादेखील त्यानंतर एका वर्षांतच करण्यात आली. आत्तादेखील मुलांच्या अक्षमता आणि मानसशास्त्र यासंदर्भात प्रीझमतर्फे कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते, त्यांची पालक आणि शिक्षकांना होऊ शकते.