आपत्कालीन स्थितीमध्ये बसच्या बाहेर पडण्यासाठी प्रत्येक प्रवासी बसला आपत्कालीन दरवाजे असणे गरजेचे असते. पण, रस्त्यावर धावणाऱ्या सुमारे ऐंशी टक्क्यांहून अधिक खासगी प्रवासी बसला आपत्कालीन दरवाजेच नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अशा बसवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दरवाजे नसणाऱ्या बसवर कारवाई करून हे दरवाजे करण्यास भाग पाडण्यात आले. आता ही कारवाई थंडावल्याने हळूहळू आता खासगी बसचे आपत्कालीन दरवाजे बंद करण्यात येत आहेत.
पुणे-नागपूर खासगी प्रवासी बसला वर्धा येथे लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. आपत्कालीन दरवाजे नसल्याने संकटाच्या प्रसंगी अशा बसमधून प्रवासी तातडीने बाहेर निघू शकत नाहीत. मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्याही बसला उजव्या बाजूला आपत्कालीन दरवाजा असणे बंधनकारक आहे. बसमधील प्रवासी आत्पत्कालीन स्थितीत योग्य प्रकारे बसच्या बाहेर पडला पाहिजे, अशी या दरवाजाची रचना असावी लागते. मात्र, हजारो बस आपत्कालीन दरवाजाविनाच प्रवाशांची वाहतूक करीत असल्याचे दिसून येत होते.
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी याबाबत यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. मोटार वाहन कायद्यानुसार आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून बसला वाहतुकीसाठी परवानगी दिली जाते. आपत्कालीन दरवाजा नसेल, तर बसला परवानगी मिळूच शकत नाही. मात्र, तरीही अशा हजारो बस आजही रस्त्यांवर धावत आहेत. त्यामुळे या प्रकरणात ‘अर्थपूर्ण’ व्यवहार होत असल्याचे स्पष्ट आहे. प्रवाशांना वेळीच बाहेर पडता न आल्याने त्यांचा जीव जाण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. पण, त्याकडे आजवर गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही.
‘स्लीपर कोच’ प्रकारातील प्रवासी बसमध्ये खालच्या व वरच्या बाजूला झोपण्यासाठी बर्थ तयार केले जातात. त्यामुळे अशा बसला आपत्कालीन दरवाजे असूनही उपयोग होत नाही. दरवाजाजवळील बर्थ काढल्यास काही आसने कमी करावी लागत असल्याने खासगी वाहतूकदार आपत्कालीन दरवाजे ठेवत नसल्याचे दिसून येते. याबाबत न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर राज्याच्या परिवहन खात्याला जाग आली. त्यामुळे आरटीओकडून कारवाईही सुरू करण्यात आली होती. आपत्कालीन दरवाजे नसणाऱ्या बसवर कारवाई करून वाहतूकदाराला अशा प्रकारचे दरवाजे करून घेण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, आता कारवाई थंडावल्याने आपत्कालीन दरवाजे पुन्हा बंद करून त्या जागी अतिरिक्त आसने बसविण्याचे प्रकार होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onआरटीओRTO
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private bus rto emergency door sleeper coach
First published on: 05-03-2015 at 03:15 IST