प्राध्यापकांची २ हजार ८८ पदे, प्राचार्यांच्या सर्व रिक्त पदांची भरती

राज्यात प्राध्यापकांची २ हजार ८८ आणि प्राचार्यांच्या सर्व रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : राज्यात प्राध्यापकांची २ हजार ८८ आणि प्राचार्यांच्या सर्व रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्या बाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. प्राध्यापक भरतीसाठी सातत्याने आंदोलने करणाऱ्या पात्रताधारकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला, तरी भरती प्रक्रिया कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही.

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याचे निर्देश देशभरातील विद्यापीठांना, महाविद्यालयांना देण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली प्राध्यापकांची पदे भरण्याची मागणी पात्रताधारकांकडून करण्यात येत होती. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दोन वर्षांपूर्वी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सातत्याने प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत पात्रताधारकांच्या संघटनांना आश्वासने दिली होती. मात्र वित्त विभागाकडून मान्यता मिळत नसल्याने राज्यातील प्राध्यापक भरती रखडली होती. त्यामुळे घड्याळी तासिका तत्त्वावर काम करावे लागणाऱ्या नेट-सेट, पीएच.डी. धारकांमध्ये प्राध्यापक भरती कधी होणार याबाबत अस्वस्थता होती.

या पार्श्वभूमीवर  प्राध्यापक भरतीच्या पहिल्या टप्प्यात २ हजार ८८ पदे आणि प्राचार्यांची सर्व पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली. प्राध्यापकांच्या सर्व रिक्त पदांवर भरती करण्यासाठी पात्रताधारकांच्या संघटनांनी पुण्यासह राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली. आता प्राध्यापक भरतीच्या पहिल्या टप्प्यात २ हजार ८८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असली, तरी प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याबाबत स्पष्टता नसल्याने एकूण भरती प्रक्रियेबाबत साशंकताच असल्याचे चित्र आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Professor recruitment principals ysh