कारवाई झाली तरी चालेल, पण परीक्षांच्या कामावरील बहिष्कार कायमच राहील; अशी हटवादी भूमिका प्राध्यापक संघटनेने कायम ठेवली आहे. शासन आश्वासने पाळत नसल्यामुळे परीक्षांच्या कामकाजावरील बहिष्कार कायम ठेवणार असल्याचे प्राध्यापकांच्या एमफुकटो या संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
प्राध्यापकांच्या बहिष्काराला तीन महिने झाले असून परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय प्राध्यापक संघटनेने घेतला आहे. एमफुकटो च्या शुक्रवारी पुण्यात झालेल्या बठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याबाबत पाटील यांनी सांगितले, ‘‘शासनाने प्राध्यापकांचा विश्वासघात केला आहे. राज्याने पाचशे कोटी देण्याचे जाहीर केले, पण त्याबाबत काहीही तरतूद केली नाही. त्यामुळे फक्त आश्वासनांच्या आधारावर बहिष्कार घेतला जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या नुकसानीबाबत प्राध्यापकांप्रमाणेच राज्य सरकारलाही प्रश्न विचारा. प्राध्यापकांवर कारवाई कशी करता येईल याचा अभ्यास करण्यात शासन जो वेळ घालवत आहे, तो वेळ प्रश्न सोडवण्यासाठी द्यावा. मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री कधीच बोलले नाहीत. मुख्यमंत्री आणि उच्चशिक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यात तफावत आहे. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बहिष्कार मागे घेतला, या वेळी माघार घेणार नाही.’’
नेट-सेट बाबत विचारले असता पाटील म्हणाले,‘‘नेट- सेट ग्रस्त प्राध्यापकांबाबत शासनाची भूमिका क्रौर्याची आहे. राज्यातील दहा हजार प्राध्यापकांना त्याचा फटका बसणार आहे.’’ प्राचार्य किंवा कुलगुरूंना परीक्षेच्या कामावरील बहिष्कार मागे घेत असल्याचे कोणतेही पत्र संघटनेने दिले नसून प्राध्यापकांनी काम सुरु केल्याची आकडेवारी फुगवून सांगितली जात आहे, असेही पाटील यांनी सांगितले.