पदयात्रा, वैयक्तिक भेटीघाटी, प्रचारफेऱ्यांवर उमेदवारांचा भर

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक पट्टय़ात गुरुवारच्या सुटीचे औचित्य साधून शहरातील तीनही विधानसभा मतदार संघांतील उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पदयात्रा, वैयक्तिक भेटीघाटी, प्रचारफेरींमुळे शहरातील वातावरण तापल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. भल्या पहाटे उठून सकाळी व्यायामाला जाणारे नागरिक तसेच रात्री शतपावलीला निघालेल्या नागरिकांशीही उमेदवारांचा संवाद कार्यक्रम सुरू होता.

पिंपरी-चिंचवडचा परिसर औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी बहुतांश कंपन्यांमध्ये गुरुवारी सुटीचा दिवस असतो. येत्या रविवारी (२० ऑक्टोबर) जाहीर प्रचाराची मुभा राहणार नसल्याने सर्वच उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनासाठी गुरुवारची निवड केल्याचे दिसून आले.सकाळपासूनच चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या शहरातील तीनही मतदार संघांतील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या होता. उशिरापर्यंत उमेदवारांचे मतदारांशी संपर्क अभियान सुरू होते.

पिंपरीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी आकुर्डी काळभोरनगर पदयात्रा काढली. राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा वैशाली काळभोर आणि पक्षाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी चिंचवड मोहननगर परिसरात पदयात्रा काढली.  या वेळी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे यांच्यासह युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोसरीतील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी गुरुवारी पहाटेच प्रचाराला सुरुवात केली. सकाळी व्यायामाला बाहेर पडलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. याशिवाय, तीनही मतदार संघांतील इतर उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्यात येत होता. निवडणुकीला जेमतेम तीन दिवस राहिले असल्याने गुरुवारी मतदान पावती (वोटिंग स्लिप) देण्याचे काम उरकण्यावर कार्यकर्त्यांचा भर दिसून येत होता.